
SIR प्रकरणी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात रोष वाढत आहेत. त्यांच्यावर चौफर टीका होत असून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे. पण निवडणूक आयोगावर आरोप होत असताना भाजपचे नेते उत्तर देत आहेत. या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवडणूक आयोगाचा वकील म्हणून नेमलं आहे का? असा टोला शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. तसेच राज्यात ताबडतोब निवडणुका लावल्या तर मिंधे गट आणि भाजप इथे औषधलाही राहणार नाही असेही संजय राऊत म्हणाले.
जुन्ररमध्ये पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मूळ शिवसेना ही उद्धव ठाकरे यांची आहे. बाकी सेना डुप्लिकेट आहेत, या डुप्लिकेटचा खेळ सर्वोच्च न्यायालय संपवणार. ज्या पद्धतीने सुनावणी पुढे चालली आहे आणि निवडणूक आयोगाने आणि तेव्हाच्या सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेचे तुकडे करताना असंविधानात्मक पद्धतीने जी पापं केली, त्याच पापाविरोधात आज आगडोंब उसळलेला आहे. त्यामुळे आता मूळ शिवसेनेचेच राज्य येईल. 2024 साली सुद्धा विधानसभेत शिवसेनाच जिंकली होती हे आता लोकांना पटायला लागले आहे. राज्यात आणि देशात भाजपचा विजय कसा झाला हे आता ज्ञानेश कुमारांचे कारनामे समोर आले आहेत. राज्यात मिंधे, फडणवीस आणि ज्ञानेश कुमार या त्रिकुटाचे जे कारनामे झाले त्यातून हा अकृत्रिम पराभव घडवला गेला. ज्ञानेश कुमार यांचा निकाल लावा आणि ताबडतोब निवडणुका लावल्या तर मिंधे गट आणि भाजप इथे औषधलाही राहणार नाही. आम्ही आशावादी आहोत, जनतेचे अनेक प्रश्न आहेत त्यावर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार बोलत नाहीत. मुख्यंमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकदिवसा आड दिल्लीत असतात. त्यांच एवढं दिल्लीत काय काम असतं आम्हाला माहित नाही. या सगळ्या गोष्टींची नोंद जनता करत असते. राज्यात दुष्काळ पडला आहे आणि त्यावर कोणीही गांभीर्याने चर्चा करताना दिसत नाही. महाराष्ट्रात जमिनीवर काम करणारा एकच पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना, असे संजय राऊत म्हणाले.
इंडिया आघाडीचे महत्त्वाचे घटक आहोत. सहा तारखेला संसदेकडे जो मोर्चा गेला, त्यात राहुल गांधींसोबत सर्वात पुढे मीच होतो. त्यानंतर उशिरा मुंबईत आलो. 10 तारखेनंतर आम्ही मोकळे आहोत. दिल्लीत कितीही मोठं आंदोलन होऊ दे, तुरुंगात जावं लागलं तरी चालेल आम्ही तयार आहोत. आमचे खासदार अरविंद सावंत अमरावतीत शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अडकलो आहोत. मी जुन्नरला आलो आहे. दिल्लीतले कार्यक्रम ठरलेले नव्हते आणि आमचे कार्यक्रम ठरले होते ते पूर्ण करू आणि मग आम्ही दिल्लीत जाऊ, असेही संजय राऊत म्हणाले.
SIR चे समर्थन म्हणजे घोटाळ्याला समर्थन नव्हे. ज्या मतदारांचा मृत्यू झाला आहे, त्यांची नावं हटवण्यात गैर नाही. पण एखाद्या भागात शिवसेनेला मतदान होत आहे, म्हणून ती नावं काढायची, बंगालमध्ये एक विशिष्ट समुदाय तृणमूलला मतदान करतो म्हणून त्यांना मतदानापासून वंचित ठेवायचं याला SIR नाही म्हणत. ज्ञानेश कुमार एक नंबरचा भ्रष्ट आणि घोटाळेबाज माणूस आहे. भाजपला त्यांचा एवढा पुळका का आलाय? निवडणूक आयोगावर जर काही आरोप होत असेल तर निवडणूक आयोग उत्तर देईल. देवेंद्र फडणवीस यांना निवडणूक आयोगाचा वकील म्हणून नेमलं आहे का? निवडणूक आयोग जर एक संविधानिक संस्था असेल तर त्यांना त्यांची बाजू मांडू द्या. ज्ञानेश कुमार भुमीगत झाले आहेत कुठे पळून गेले आहेत? SIR मध्ये घोटाळा झाला हे आम्ही सांगतच होतो. पण दोन निवडणूक आयुक्तांनी आपली असहमती व्यक्त केली आणि त्यानंतर या प्रकरणाने अधिक पेट घेतला, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळालं पाहिजे, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.
जेव्हा सरकारचे हात दगडाखाली अडकलेले असतात. जेव्हा त्यांना ते काढता येत नाहीत किंवा तसेच ठेवता येत नाहीत, सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी सरकारची परिस्थिती आहे. जर या सगळ्यांना सोडलं तर हे लोक सरकारचे बिंग फोडतील. म्हणून राहुल गांधी यांनी ज्ञानेश कुमारांना सांगितले आहे की, राजीनामा द्या आणि माफीचा साक्षीदार व्हा. लोकसेवा आयोगात अनेक वर्ष प्रशासनांमध्ये नोकऱ्यांमध्ये एका विशिष्ट विचारांची माणसं यावीत यासाठी लोकसेवा आयोगाचा गैरवापर करण्यात आला. नीट पेपरफुटी प्रकरणात जी आठ माणसं महाराष्ट्रातून पकडण्यात आली आहेत, हे सगळे कागदोपत्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपशी संबंधित आहेत. आणि लोकसेवा आयोगातसुद्धा फडणीवासांनी त्याच प्रकारची लोकं भरलेली आहेत, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.
एखादे आंदोलन सुरू आहे म्हणून ड्राय डे जाही करणं हा नवीन पायंडा पडत आहे. देशामध्ये ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. याक्षणी संपूर्ण देशात 1103 ठिकाणी आंदोलन सुरू आहे. याची माहिती देणारी एक वेबसाईटही सुरू झाली आहे. संपूर्ण देशात आंदोलन सुरू आहे मग तुम्ही संपूर्ण देशात ड्राय डे लागू करणार आहात का? सर्वात आधी गुजरातमध्ये ड्राय डे लावा. कारण सर्वाधिक बेकायदेशीर दारू आणि अंमली पदार्थ गुजरातमध्ये विकले जातात.
ज्ञानेश कुमारांविरोधात महाभियोग चालवण्यासाठी आम्ही एक प्रस्ताव आणला होता. त्यावर 60 खासदारांनी सह्या केल्या होत्या. तरीही राज्यसभेचे चेअरमन जे कधी काळी संघाचे प्रचारक होते त्यांनी तो प्रस्ताव फेटाळून लावला. त्यामुळे यंदा संसद चालेल असं वाटत नाही.
जनमताचा रेटा आहे आणि लोकभावना आहे. न्यायालयाच्या आदेशाने प्रश्न संपत असले तर या देशात रामराज्य आलं असतं. मुळात या देशातील न्यायव्यवस्थेमध्येसुद्धा भाजपने आपली माणसं घुसवली आहेत. आणि न्यायव्यवस्थेसाठी ही गंभीर बाब आहे. हजारो विद्यार्थी जेव्हा आंदोलन करतात न्यायालयाने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे आणि त्यानुसार कारवाई केली पाहिजे. दंडुक्याचे राज्य संपले आहे, असेही संजय राऊत यांनी नमूद केले.























































