
आसाममधील बारपेटा जिल्ह्यातील हाउली येथे राष्ट्रीय महामार्ग 27 वर बीएसएफ जवानांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात बीएसएफचे 32 जवान जखमी झाले असून, बस चालकाचा जागीच मृत्यू झाला. जखमींपैकी 14 जवानांची प्रकृती गंभीर असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. गंभीर जखमींना बारपेटा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, निवडणूक ड्युटीवरून परतत असताना जवानांची बस ट्रकच्या मागील भागावर धडकली. ही बस धुब्रीच्या दिशेने जात असताना ही धडक झाली. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. बसचालकाचा जागीच मृत्यू झाला. समसुल हक (42) असे मयत चालकाचे नाव आहे. अपघाताची माहिती मिळताच हाउली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. पोलीस पुढील तपास करत आहेत.


























































