
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मतदार यादीतील घोळावरून निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवला. सादरीकरणाद्वारे मतदार यादीतील विसंगती मांडत त्यांनी आयोगाचा गोलमाल जगजाहीर केला. मतदार यादी विशेष पुनरिक्षणानंतर (एसआयआर) महाराष्ट्रातील 7 लाख 90 हजार मतदार गायब झाले आहेत, तर मुंबईतील 5 लाखांवर मतदारांचाही पत्ता नाही, असे आकडेवारीसह आदित्य ठाकरे यांनी समोर आणले. हे मतदार गेले कुठे, राज्याबाहेर गेले की देशाबाहेर, असा सवाल करतानाच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर खटला भरून त्यांना तुरुंगात टाका, अशी मागणी त्यांनी केली.
आदित्य ठाकरे यांनी शिवसेना भवनमध्ये पत्रकार परिषद घेऊन ‘गोलमाल ज्ञानू’ हे सादरीकरण केले आणि आकडेवारीच मांडली. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 24 मे 2026 रोजी 9 कोटी 86 लाख 44 हजार 413 मतदार होते. 31 ऑगस्टला आयोगाने एसआयआरनंतर जाहीर केलेली एकूण मतदारांची संख्या 9 कोटी 78 लाख 54 हजार 49 होती. मग 7 लाख 90 हजार 364 मतदार गेले कुठे, हा प्रश्न आपल्याला गोलमाल ज्ञानूला विचारायचाय, अशा शब्दांत आदित्य ठाकरे (पान 1 वरून) यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर निशाणा साधला.
मागील निवडणुकांमध्ये मतदान केलेल्यांची नावेही कट
मुंबईतील आकडेवारीबद्दल बोलताना आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील 5 लाखांवर मतदारांचा यादीत पत्ताच नाही, असे सांगितले. लोकसभा, विधानसभा आणि मुंबई महानगरपालिकेच्या मतदार याद्यांमध्ये त्यांची नावे होती, पण एसआयआरनंतर जाहीर यादीमध्ये त्यांचा समावेशच नाही असे सांगतानाच, अधिक खोलवर गेले तर हा आकडा 10 लाखांवर जाऊ शकतो, अशी शक्यताही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. दुबार मतदारांची नावेही यादीत आली आहे आणि जे खरे मतदार आहेत त्यांची नावे वगळली गेली आहेत, असेही ते म्हणाले.
बीएलओंनी घरोघर न जाता मतदारांना गैरहजर दाखवले
एसआयआर प्रक्रियेसाठी नेमलेल्या बीएलओंनी मतदारांच्या घरी तीन वेळा जाऊन पडताळणी करणे आवश्यक होते; परंतु त्यांनी केवळ सोसायटय़ांच्या कार्यालयात बसून नोंदणी केली आणि घरोघर तपासणी न करता मतदारांना गैरहजर दाखवले, असे आदित्य ठाकरे म्हणाले. बीएलओंनी किती मतदारांच्या घरी भेट दिली त्याचीही काहीच नोंद नाही, हेसुद्धा त्यांनी निदर्शनास आणले. अनेक मतदारांना एकच एपिक नंबर, मृत व्यक्तींचीही नावे यादीत आहेत आणि ज्यांना स्थलांतरित दाखवले गेलेय ते मतदार अजूनही तिथेच आहेत, असा आयोगाचा गैरकारभारही त्यांनी दाखवून दिला.
भिवंडीच्या आकडेवारीत शेकडो मतदारांची तफावत
भिवंडी पूर्व मतदारसंघातील आकडेवारीचा दाखला देत आदित्य ठाकरे म्हणाले की, भिवंडीत 2024 मध्ये 3 लाख 73 हजार 659 मतदार होते आणि विधानसभा निवडणुकीत त्यातील 1 लाख 91 हजार 691 जणांनी मतदान केले, मात्र एसआयआर प्रक्रियेनंतर 1 लाख 91 हजार 443 असा आकडा दाखवला गेला. मग 254 मतदार गेले कुठे, हवेतून आले, हवेत गेले… राज्याबाहेर की देशाबाहेर गेले, असा सवाल त्यांनी केला.
2029 पूर्वीच भाजपचे सरकार कोसळेल
देशात सध्या आणीबाणीसारखी (इमर्जेन्सी) स्थिती निर्माण केली गेली आहे ती गद्दार ज्ञानेश कुमार यांना वाचवण्यासाठीच आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला. ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात देशभरात रस्त्यावर आंदोलने होत आहेत आणि ती अधिक तीव्र होत जाणार आहेत. केवळ दिल्लीच नव्हे तर संपूर्ण देशात तसे वातावरण आहे आणि ते पाहता 2029 पूर्वीच सरकार बदलेल, असा इशाराही त्यांनी दिला.
भीमनवार… विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका
एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी उपोषण करत आहेत. अनेक विद्यार्थी दुष्काळी भागांमधील आहेत. भीमनवार त्यांच्या सहनशीलतेचा अंत का पाहत आहेत, त्यांनी तातडीने पदावरून दूर व्हावे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री त्यांचे मित्र असतील तर त्यांनी दुसरे पद घ्यावे, पण एमपीएससीवरून दूर व्हावे, अशी चपराकही त्यांनी लगावली.
माहीममध्ये 900 पात्र मतदारांना नोटिसा
माहीममधील 900 मतदारांचे मॅपिंग न झाल्याने त्यांना नोटिसा आल्या. त्या मतदारांनी प्रत्येक निवडणुकीत मतदान केले आहे. त्यांचे ड्राफ्ट रोलमध्ये नाव असूनही त्यांना नोटिसा पाठवल्या गेल्या आहेत, माहीममध्ये अशी इतकी नावे असतील तर महाराष्ट्रात आणि देशात किती असतील, असे ते म्हणाले. काही जिवंत व्यक्तींना मृत दाखवण्यात आल्याचा आरोप करत एसआयआरचा आधार नेमका कोणता, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.






























































