
रुग्णाला पूर्णपणे भूल देणारा जनरल अॅनेस्थेशिया म्हणजे शस्त्रक्रियेदरम्यान दिली जाणारी भूल शरीरात नेमकी कशी काम करते, हे अद्याप पूर्णपणे समजलेले नाही. तरीही मानवी चेतना आणि जाणीव नेमकी काय असते याच्या अनेक महत्त्वपूर्ण पैलूंवर यामुळे प्रकाश पडत आहे.
1846 मध्ये `जनरल अॅनेस्थेशिया’चा शोध लागला आणि वैद्यकीय जगतात उत्क्रांती घडली. रुग्णाला गाढ गुंगीत नेण्यासाठी विविध प्रकारची अॅनेस्थेटिक्स औषधे सध्या उपलब्ध आहेत. जनरल अॅनेस्थेशिया औषध शरीरात गेल्यामुळे मेंदूतील नर्व्ह सेल्स म्हणजे चेतापेशींमधील संदेशवहन पूर्णपणे थांबते. त्यांच्यातील संकेतांची देवाणघेवाण बंद पडते. मेंदूच्या आत खोलवर असलेला थॅलमस हा अंडाकृती भाग वेगवेगळ्या भागांना एकत्र जोडणाऱ्या मुख्य केंद्रबिंदूसारखा काम करतो.
जेव्हा रुग्णाला भूल दिली जाते, तेव्हा हा थॅलेमस सर्वात आधी काम करणे थांबवतो, असे काही तज्ञांचे मत आहे तर काहींच्या मते, मेंदूचा वरचा सुरकुत्या असलेला भाग `सेरेब्रल कॉर्टेक्स’ माणसाच्या जाणिवेचे मुख्य केंद्र आहे. त्यामुळे भूल देणाऱया औषधांचा थेट मारा याच भागावर होत असावा. मात्र मेंदूचे इतर भागही या प्रािढयेत सहभागी असतात. संपूर्ण मेंदू गुंगीत गेला तरी मेंदूतील रचनेचे जाळे एकमेकांमध्ये इतके गुंतलेले आहे की, नेमकी सुरुवात कुठून झाली आणि मेंदू कसा ठप्प झाला, हे शोधणे फार आव्हानात्मक काम आहे.


























































