
>> योगेश प्रभूदेसाई
आजपासून नवरात्रौत्सवास प्रारंभ होईल. या अनुषंगाने महिषासुरमर्दिनी ही देवता भारतीय उपखंडात लोकप्रिय होताना संप्रदाय, सांस्कृतिक प्रवाह आणि लोकपरंपरा यांची सांगड कशी घातली गेली हे समजून घेऊया.
नवरात्र साजरं करण्यामागं अजून दोन विचार आपल्याला निरीक्षणाअंती आढळतात – एक म्हणजे कृषिवल परंपरा आणि दुसरं म्हणजे क्षात्र परंपरा. कृषिवल परंपरेतून घट आणि घटाभोवतीचं रुजवण ही प्रथा दिसते तर क्षात्र परंपरेतून जागर, अष्टमीचा बळी, नवमीची खांडा/शस्त्रपूजा (खंडेनवमी) आणि विजयप्राप्तीसाठी सीमोल्लंघन (विजयादशमी) या प्रथा पुढे आलेल्या दिसतात. आज आपण या प्रथांचा मेळ असलेलं नवरात्र साजरं करतो. क्षात्र परंपरेमध्ये दुर्गेपुढं देण्यात येणारा बळी म्हणजे शत्रूचं प्रतीक असतो. शत्रुनाश हा आगाऊ कल्पून मग दुर्गेचा आशीर्वाद घेऊन पुढे फक्त युद्धाची औपचारिकता पार पाडायची असा संकेत यामागे दिसतो.
दुर्गा अथवा महिषासुरमर्दिनी आणि नवरात्र यांचा अन्योन्य संबंध आहे हे सर्वज्ञात आहेच, पण या संबंधाची सुरुवात कशी झाली, महिषासुरमर्दिनी ही देवता भारतीय उपखंडात लोकप्रिय का झाली याचा आढावा घेतला तर संप्रदाय, सांस्कृतिक प्रवाह आणि लोकपरंपरा यांची सांगड तसेच अविरत, नित्यनूतन प्रवास समजून येईल.
‘देवीभागवत’ या मध्ययुगीन ग्रंथात देवी नवरात्र वर्षातून चार वेळा करावे असा संकेत आहे. ते तसे का करावे याची कारणंही दिलेली आहेत. चैत्र, आषाढ, आश्विन आणि माघ अशी चार नवरात्रं सांगितलेली आहेत. यांतील चैत्र आणि आश्विन (म्हणजेच शारदीय; जे आपण मुख्य रूपाने साजरं करतो) ही विशेषत करावीत असं सांगितलेलं आहे. कारण या नवरात्रींचा काळ घनघोर मानलेला असून त्यादरम्यान रोगराईचा प्रादुर्भाव असतो. म्हणजे यातून हे लक्षात येतं की, रोगराई, महामारी, विशेषत साथीचे रोग निवारण्यासाठी दुर्गेची पूजा करण्याचा प्रघात होता. याअनुषंगाने आपण ‘देवीमाहात्म्य’मधील ‘पादिस्तुती’ या चौथ्या अध्यायातील या श्लोकाकडे पाहू या – दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तो: स्वस्थै: स्मृता मतिमतीव शुभां ददासि। दारिद्रय़दु:खभयहारिणि का त्वदन्या सर्वोपकारकरणाय सदा।़।़र्द्रचित्ता? (अर्थ – हे देवी दुर्गे, तुझे स्मरण केले असता तू सर्व प्राण्यांची भीती दूर करतेस आणि निरोगी किंवा सुखी असताना तुझे स्मरण केले असता तू त्यांना अतिशय उत्तम अशी शुभ बुद्धी प्रदान करतेस. दारिद्रय़, दुःख आणि भय यांचा नाश करणारी तसेच सर्वांवर उपकार करण्यासाठी सदैव करुणापूर्ण चित्त असणारी तुझ्याशिवाय दुसरी कोण आहे?). त्यानंतर आपण ‘एकादश अध्याया’तील या श्लोकाकडे पाहू या – रोगानशेषानपहंसि तुष्टा रुष्टा तु कामान् सकलानभीष्टान्। त्वामाश्रितानां न विपन्नराणां त्वामाश्रिता ह्याश्रयतां प्रयान्ति (अर्थ – हे देवी! तू प्रसन्न झालीस तर सर्व रोगांचा नाश करतेस आणि रागावलीस तर सर्व प्रकारच्या हव्या असलेल्या (अभिमत) कामनांचा नाश करतेस. ज्या लोकांनी तुझ्यासमोर शरणागती पत्करली आहे, त्यांच्यावर कधीही विपत्ती येत नाही आणि तुला शरण गेलेले लोक स्वतच इतरांना आश्रय देणारे होतात.)
दुर्गादेवीची प्राचीनता साधारणत प्राप्त साधनांवरून ठरवता येते. कृष्ण यजुर्वेदातील ‘महानारायणोपनिषदा’मध्ये येणारे दुर्गासूक्त, कुषाण-गुप्त कालखंडातील महिषमर्दिनी शिल्प यांवरून साधारण इसवी सनाच्या तिसऱया-चौथ्या शतकापासून दुर्गेचा संप्रदाय अस्तित्वात होता असं म्हणता येऊ शकतं किंवा संप्रदाय नसता किमान त्या देवतेची पूजन परंपरा अस्तित्वात होती इतकं तरी निश्चितच म्हणता येऊ शकतं. पुढं साधारण इसवी सनाच्या चौथ्या ते सहाव्या शतकांत कधीतरी ‘देवीमाहात्म्य मार्कंडेय पुराणा’त प्रक्षिप्त झाले असावे. तेरा अध्यायांचे हे आख्यान तीन प्रमुख देवतांविषयी माहिती देत असल्याने याला चरित्रत्रयी असं म्हणता येईल. प्रथमचरित्र नायिका – महाकाली (अध्याय 1), मध्यमचरित्र नायिका – महिषमर्दिनी महालक्ष्मी ( अध्याय 2 ते 4) आणि उत्तरचरित्र नायिका – महासरस्वती कौशिकी ( अध्याय 5 ते 12) अशी चरित्रांची विभागणी असून तेरावा अध्याय समारोपाचा आहे. बारावा अध्याय फलश्रुतीचा असून त्यात ‘देवीमाहात्म्य’ पारायणाने युद्धात, मोठय़ा संकटात, प्रवासात किंवा राजाच्या किंवा प्रशासनाच्या भयात संरक्षण मिळणे. त्याच्या सर्व बाधा दूर होणे, कसल्याही पाप किंवा वाईट कर्माचा प्रभाव न पडणे, कधीही दारिद्रय़ किंवा आपत्ती न येणे, महामारी (रोगराई) आणि त्रिविध उत्पाद (दैविक, दैहिक आणि भौतिक संकटे) यांपासून संरक्षण मिळणे, घर, संपत्ती, अन्नधान्य आणि उत्तम संतती प्राप्त होणे, शेवटी देवीच्या परमपदाला प्राप्त होणे इत्यादी गोष्टी साध्य होतात असा निर्वाळा दिलेला आहे.
‘देवीमाहात्म्या’ची मध्यवर्ती संकल्पना (आणि देवतादेखील) महामाया असून तिचेच अवतार म्हणजे महाकाली, महालक्ष्मी (महिषमर्दिनी) आणि महासरस्वती (कौशिकी) आहेत असा विचार पुढे आणलेला दिसतो. महाकाली चरित्र संक्षिप्त, महालक्ष्मी चरित्र मध्यम विस्ताराचे तर महासरस्वती चरित्र सुदीर्घ आहे. महाकालीचे महत्त्व पहिल्या आणि बाराव्या अध्यायातून अधोरेखित केलेले आहे. असं असूनही महालक्ष्मी महिषमर्दिनी ही बघता बघता संपूर्ण ‘देवीमाहात्म्या’ची देवता बनते. याचं कारण म्हणजे ‘देवीमाहात्म्या’मध्ये समाविष्ट होण्याआधीपासून असलेली दुर्गेची लोकप्रियता आणि पूजन परंपरा. मध्यमचरित्रामुळे दुर्गेच्या प्रतिमेला आणि कदाचित संप्रदायाला वेगळा आयाम प्राप्त होतो. सर्व देवतांच्या तेजातून उत्पन्न झालेली असल्याने तिला विश्वाची आधारभूता शक्ती मानण्यात आले आणि त्याअनुषंगाने तिचे सर्वश्रेष्ठत्व प्रस्थापित आणि प्रसारित होऊ लागले. मध्यमचरित्रानुसार महालक्ष्मी महिषासुरमर्दिनी ही अष्टादशभुजा म्हणजे अठरा हातांची सांगितलेली आहे. वास्तवात पूजन परंपरेमध्ये क्वचितच अष्टादशभुजा विग्रह दिसतो. महाराष्ट्राचा विचार केला तर वणीची देवी/सप्तशृंगी देवी ही अष्टादशभुजा महिषासुरमर्दिनी महालक्ष्मी आहे. मूळ विग्रह पाहिला तर पायाशी महिषदेखील दिसतो.
मध्यम विस्ताराचे पण तरीही अपूर्ण वाटावे असे महिषासुरवधाख्यान या देवतेला अधिक बलशाली स्वरूपात प्रस्थापित करताना दिसते. महालक्ष्मी (उत्तम लक्षणांनी युक्त ती महालक्ष्मी), भद्रकाली (उग्र पण तरीही सौम्य), दुर्गा (प्राप्त करण्यास कठीण अशी), महिषासुरमर्दिनी (महिषासुराला लोळवणारी) अशी या देवतेची विशेषणे मध्यमचरित्रातून प्रकट होतात. यातील महिषासुरमर्दिनी या विशेषणाकडे पाहू या. ‘महिष’ या शब्दाचे दोन अर्थ होतात – एक म्हणजे रेडा, तर दुसरा म्हणजे राजा. ‘महिषासुरवधाख्यान’ पाहिले तर महिषासुराने सर्व देवतांना पदभ्रष्ट करून त्यांचे अधिकार घेणे आणि सर्व विश्वावर राज्य गाजवणे हे दुसऱयाचे राज्य हिसकावून घेऊन, त्याला राज्यभ्रष्ट करून त्याच्या राज्यावर सत्ता गाजवणाऱया अधर्मी राजाचे रूपक आहे. दुर्गादेवी किंवा महालक्ष्मी, जी स्वत देवांच्या तेजापासून निर्माण होते आणि त्यांनी देऊ केलेल्या शस्त्र, भेटवस्तूद्वारे सुसज्ज होऊन महिषासुराला मारते आणि ज्या त्या देवांना ज्यांचे त्यांचे अधिकार देऊन स्वराज्यावर संस्थापित करते हे धर्मपालन करून अपराजित बनलेल्या अशा राज्यलक्ष्मीचे रूपक आहे. या कारणामुळेच ही देवता क्षत्रिय वर्गात वंदनीय झालेली दिसते. शत्रुनाश करण्यासाठी, धर्मपालन करून राज्य चिरकाल टिकण्यासाठी दुर्गेची स्थापना, पूजा आणि भक्ती रूढ झालेली दिसते.
‘देवीमाहात्म्या’तील कथानकानुसार सुरथ नामक राजाला त्याचे शत्रू आणि स्वकीय परास्त करून राज्य हिसकावून घेतात. अशा वेळी मेधा ऋषींच्या उपदेशावरून राजा महामायेची आराधना करतो आणि तिच्या कृपेने स्वराज्य पुन्हा मिळवतो. त्याचबरोबर तिच्या आशीर्वादाने मृत्यूनंतर मनू बनून सुदीर्घ असे शाश्वत राज्य उपभोगतो. यावरून दुर्गा/महिषासुरमर्दिनी आणि राज्यसंपदा यांचा प्रस्थापित घनिष्ठ संबंध दृष्टोत्पत्तीला येतो.
(लेखक प्राचीन इतिहास, संस्कृती व पुरातत्त्वशास्त्राचे अभ्यायक आहेत)
























































