
शुक्रवारी रात्री 9 वाजून 35 मिनिटांनी शनि अमावास्येला प्रारंभ झाल्यामुळे शनिवारी पहाटेपासून शनिशिंगणापूरकडे भाविकांचा ओघ सुरू झाला. मंदिरापासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर चारीही बाजूने वाहनतळ उभारल्याने भाविक पायी दर्शनासाठी दाखल झाले. संपूर्ण दिवसभर अमावास्या असल्यामुळे तीर्थक्षेत्र शनिशिंगणापुरात आज भाविकांची मोठी गर्दी झाली असली तरी सर्वपित्री अमावास्या व दुष्काळाच्या सावटाखाली यात्रा पार पडली. यंदा गर्दीत घट झाली असून, 24 तासांत साडेतीन ते चार लाख भाविकांनी शनिमहाराजांच्या दर्शनासाठी हजेरी लावली.
आज पहाटे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी शनिदेवाच्या जयजयकाराने संपूर्ण मंदिर परिसर दणाणून गेला. दुपारी मध्यान्ह आरतीवेळी शनिमूर्तीला गंगेचे पाणी व पंचामृताने स्नान घालण्यात आले. मूर्तीला नीलवस्त्र, कपाळी गंध, रुईसह गुलाबाचा हार, सोन्याचा मुकुट व दागिने असा साज चढवण्यात आला होता. झिम्बाब्वे येथील जयेश शहा, राहुल हेगडे (पुणे) यांच्या हस्ते मध्यान्ह आरती करण्यात आली.
यात्राकाळात शुक्रवारपासून शनी चौथरा बंद केल्याने भाविकांनी चौथऱ्याखालूनच दर्शन घेतले. अमावास्या दिवसभर असल्याने मोठी यात्रा भरणार, ही अपेक्षा ठेवून मंदिर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर वाहनतळ उभारल्याने भक्तांना पायी प्रवास करावा लागला. मुळा कारखाना साइटवरील वाहनतळावर भाविकांची वाहने थांबवल्याने भाविकांना मंदिरापर्यंत जाण्यासाठी पोलिसांनी रिक्षांना परवानगी दिली होती.
मंदिराच्या महाद्वारासमोर टेंट उभारून भाविकांची नागमोडी दर्शन रांग केल्याने रांगेत भाविकांच्या गर्दीवर आळा बसला. दर्शनासाठी एकच मुख्य मार्ग असल्याने भाविकांच्या मंदिरात रांगा लागल्या. यात्रा नियोजनासाठी जिल्हा पोलीसप्रमुख एम. सुदर्शन यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त तैनात केला होता. अनेक दानशूर भक्तांनी भाविकांना अन्नदान, नाष्टा, चहा, पाण्याचे मोफत वाटप केले. सायंकाळपर्यंत चार लाख भाविकांनी शनी दर्शनाचा लाभ घेतला.
दुष्काळाचे सावट
संपूर्ण पावसाळा कोरडा गेल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला. त्यातच उभी पिके नष्ट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, दुष्काळाचे चटके सर्वत्र दिसत असल्याने काही प्रमाणात शेतकरी व भाविकांनी यात्रेकडे पाठ फिरवल्याचे दिसले.


























































