
दिल्लीतील जंतर-मंतर येथे प्रस्तावित आंदोलनापूर्वी ताब्यात घेण्यात आलेल्या यूट्यूबर ध्रुव राठी याची शनिवारी रात्री उशिरा सुटका करण्यात आली. मात्र, सुटकेनंतर ध्रुव राठीने दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘मला अटक करण्यात आली नव्हती किंवा ताब्यातही घेतलं नव्हतं, तर माझं अपहरण करण्यात आलं होतं,’ असा दावा त्याने सोशल मीडियावरील पोस्टमधून केला आहे.
कॉक्रोच जनता पार्टीच्या (CJP) वतीने शनिवारी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार होते. मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकन प्रक्रियेत (SIR) कथित अनियमितता झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला होता. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी राजधानीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती.
I was not arrested or detained, I was KIDNAPPED.
Thank you for your support, here’s the full story 👇 https://t.co/gcN8cAUOmY
— Dhruv Rathee (@dhruv_rathee) October 11, 2026
ध्रुव राठी याला शनिवारी सकाळी गुरुग्राममधील सेक्टर ५६ येथील त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलनासाठी आंदोलकांना जंतर-मंतर येथे पोहोचण्यापासून रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. रात्री उशिरा त्याची सुटका करण्यात आली. मात्र, घरी परतल्यानंतर ध्रुव राठीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत पोलिसांच्या कारवाईबाबत वेगळी भूमिका मांडली. ‘मला अटक करण्यात आली नव्हती किंवा ताब्यातही घेतलं नव्हतं, तर माझं अपहरण करण्यात आलं होतं. तुमच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद. संपूर्ण कहाणी येथे आहे,’ अशा आशयाची पोस्ट त्याने एक्सवर केली आहे.
कॉक्रोच जनता पार्टीनेही या घटनेबाबत दावा केला आहे. शनिवारी सकाळी आठ वाजता साध्या वेशातील सुमारे ५० पोलीस कर्मचारी ध्रुव राठीच्या घरी आले आणि त्याला घेऊन गेले, असे पक्षाने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे. ध्रुव राठीने प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन करून जंतर-मंतर येथे जाण्याचा प्रयत्न केल्यास त्याला पुन्हा ताब्यात घेतले जाऊ शकते किंवा त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असा इशारा एका पोलीस अधिकाऱ्याने दिला आहे.
























































