
मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेवरून (SIR) देशातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच भारतीय निवडणूक आयोगात महत्त्वाचा प्रशासकीय बदल करण्यात आला आहे. राजस्थान कॅडरचे २०१० च्या तुकडीतील IAS अधिकारी प्रकाश राजपुरोहित यांची उप निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ नियुक्ती समितीने या नियुक्तीला मंजुरी दिली आहे.
कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (DoPT) जारी केलेल्या आदेशानुसार, प्रकाश राजपुरोहित एप्रिल २०३० पर्यंत या पदाची जबाबदारी सांभाळतील. निवडणूक आयोगातील हे महत्त्वाचे पद गेल्या ऑगस्टपासून रिक्त होते. त्यामुळे या नियुक्तीकडे प्रशासकीय स्तरावर महत्त्वाची घडामोड म्हणून पाहिले जात आहे.
प्रकाश राजपुरोहित हे मे २०२६ पासून संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागात सहसचिव म्हणून कार्यरत होते. केंद्र सरकारने अलीकडेच सहसचिव आणि समकक्ष दर्जाच्या २७ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांना मंजुरी दिली होती. राजपुरोहित यांची निवडणूक आयोगातील नियुक्तीही याच प्रशासकीय फेरबदलाचा भाग आहे. यापूर्वी मतदारयादी आणि माहिती तंत्रज्ञान विभागाची जबाबदारी सांभाळणारे उप निवडणूक आयुक्त संजय कुमार यांना ऑगस्ट महिन्यात मुदत पूर्ण होण्यापूर्वीच त्यांच्या मूळ संवर्गात परत पाठवण्यात आले होते. त्यानंतर त्यांची दिल्ली सरकारमध्ये नियुक्ती करण्यात आली. विशेष म्हणजे, २४ जून २०२५ रोजी देशभरात विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासंदर्भात निवडणूक आयोगाने जारी केलेल्या महत्त्वाच्या आदेशावर संजय कुमार यांची स्वाक्षरी होती.
























































