
केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद आता मुंबईतही उमटले आहेत. दिल्लीनंतर मुंबईतील दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क परिसरात कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) कार्यकर्त्यांनी आंदोलनाची तयारी केली असताना पोलिसांनी परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला. शिवाजी पार्ककडे जाणारे रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले असून, अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे.
परिसरात येणाऱ्या नागरिकांची चौकशी केली जात असून, विविध मार्गांवर बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. या कारवाईदरम्यान आंदोलनाशी कोणताही संबंध नसलेल्या नागरिकांनाही ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. आपण केवळ फिरण्यासाठी आलो होतो किंवा कामावरून घरी जात होतो, आंदोलक नसल्याचे सांगूनही पोलिसांनी आपले म्हणणे ऐकले नाही, असा दावा काही तरुणांनी केला आहे. पुण्याला जाण्यासाठी दादर येथे आलेल्या तरुणाला आंदोलक समजून पोलिसांनी पकडून नेले आहे. शिवाजी पार्क परिसरात पोलिसांनी केलेल्या व्यापक बंदोबस्तामुळे आणि नागरिकांना ताब्यात घेतल्यामुळे आता वातावरण अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शिवाजी पार्क परिसरामध्ये जो हिटलर कि चाल चलेगा वो हिटलर कि मौत मरेगा….. जय जय जय भीम… जय भीम, जय भीम… आंबेडकर, आंबेडकर अशा घोषणा देण्यात येत आहेत.























































