डरो मत! राहुल गांधी यांची देशाला साद; मतचोरीविरोधात उद्या सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कथित मतचोरी, मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची (SIR) प्रक्रिया आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधकांनी केंद्र सरकारविरोधातील आंदोलन तीव्र केले आहे. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया एक्सवर पोस्ट करत सोमवारी, १२ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने मोर्चा काढण्याचे आवाहन केले आहे.

दिल्लीतील शांततापूर्ण आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांना पोलिसांनी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. तरुणांच्या मनात द्वेष किंवा राग नव्हता, तर प्रेमाची भावना होती. मात्र, त्यांच्यावर झालेली कारवाई हा आपल्याला हवा असलेला भारत नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये देशातील तरुण, सर्व विरोधी पक्ष, नागरी समाजातील संघटना आणि भारतीय संविधानावर विश्वास असलेल्या नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. पक्षीय राजकारण, स्त्री-पुरुष भेद, जात, समुदाय आणि राज्यांच्या सीमा बाजूला ठेवून भारतीय म्हणून एकत्र चालण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

सोमवारी सर्वोच्च न्यायालयाकडे कूच करून भारताच्या सरन्यायाधीशांना देशाच्या वतीने निवेदन सादर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कथित मतचोरीला आळा घालावा, SIR प्रक्रियेला स्थगिती द्यावी आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, या प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात येणार आहेत. निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततेवरून विरोधकांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले आहेत. या आरोपांना भाजप आणि निवडणूक आयोगाने यापूर्वी आक्षेप घेतला आहे.

राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्यावरही निशाणा साधला. हे नेते हिंदुस्थानचा आवाज दाबू शकत नाहीत आणि धमक्यांमुळे आंदोलन थांबणार नाही, असा दावा त्यांनी केला. ‘आम्ही प्रेम, बंधुभाव आणि देशभक्तीच्या भावनेतून एकत्र चालणार आहोत. घाबरू नका,’ असा संदेश देत राहुल गांधी यांनी सोमवारी होणाऱ्या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.