
शिक्षणानिमित्त बाहेरून येणाऱया मुला-मुलींसाठी म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे काळाचौकीतील जिजामाता नगर येथे उभारण्यात येत असलेल्या अद्ययावत वसतिगृहाचे काम अंतिम टप्प्यात आहे. दिवाळीला या वसतिगृहाचे लोकार्पण करण्याचे म्हाडाचे उद्दिष्ट होते. मात्र लिफ्ट आणि पार्ंकगचे काम अपूर्ण असल्यामुळे डिसेंबर अखेरीस किंवा नववर्षाच्या सुरुवातीला या वसतिगृहाचे लोकार्पण होणार आहे.
मुंबईत शिक्षण किंवा रोजगारानिमित्त आलेल्या मुला-मुलींना मुंबईत भाडय़ाने घरे शोधण्यासाठी वणवण करावी लागते. अशा विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये याकरता म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे 2022 साली काळाचौकी येथील जिजामाता नगर येथे वसतिगृह उभारण्याचे काम सुरू झाले होते. 1527 चौरस मीटर भूखंडावर हे अठरा मजली वसतिगृह उभारण्यात येत असून त्यासाठी 35 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. तळ अधिक अठरा मजली या वसतिगृहात पाच मजले कमर्शियल असणार आहेत. त्यात बँक, बँक्वेट हॉल अशा सुविधा असतील. त्यापुढील मजल्यावर 137 खोल्या आहेत. एका खोलीत तीन याप्रमाणे 375 विद्यार्थ्यांच्या निवाऱयाची सोय होणार आहे. या वसतिगृहामधील खोल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात याव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
खासगी संस्थेची करणार नियुक्ती
लोकार्पणानंतर हे वसतिगृह चालवण्यासाठी निविदा काढून एखाद्या संस्थेची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे वसतिगृहातील खोल्यांचे दर सर्वसामान्य ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना परवडण्याजोगे असतील का, याकडे आता लक्ष लागले आहे.



























































