इमारती, कार्यालये, मोकळ्या जागांचे भाडे, मीरा-भाईंदरच्या पोलिसांनी पालिकेचे थकवले 11 कोटी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मीरा-भाईंदर पोलिसांकडे मीरा-भाईंदर महापालिकेची सुमारे तब्बल ११ कोटी २८ लाख ७७ हजार रुपयांची थकबाकी असल्याचे समोर आले आहे. महापालिका प्रशासनाने पोलिसांसाठी इमारती, कार्यालये आणि जप्त केलेली वाहने ठेवण्यासाठी मोकळ्या जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचे भाडे पोलीस आयुक्तालयाकडे थकलेले आहे.

मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे कामकाज १ ऑक्टोबर २०२० पासून सुरू झाले. त्यावेळी पोलीस आयुक्तालय, पोलीस ठाणे आणि चौक्यांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध नसल्याने महापालिकेने स्वतःच्या ताब्यातील इमारती आणि मोकळ्या जागा भाडेतत्त्वावर दिल्या होत्या. जप्त वाहने ठेवण्यासाठीही विविध ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. महापालिकेच्या प्रस्तावानुसार पोलीस कार्यालये व पोलीस ठाण्यांसाठी दिलेल्या इमारतींच्या भाड्यापोटी ३ कोटी ३५ लाख ३६ हजार रुपये थकीत आहेत. जप्त वाहने ठेवण्यासाठी दिलेल्या मोकळ्या जागांचे तब्बल ६ कोटी ९६ हजार रुपये भाडे बाकी आहे. विविध पोलीस चौक्यांचे १० लाख २२ हजार रुपये भाडे तसेच पोलीस आयुक्तालय आणि पोलीस उपायुक्त कार्यालयासाठी केलेल्या फर्निचरवरील १ कोटी ८२ लाख २२ हजार रुपयांचा खर्चही अद्याप वसूल झालेला नाही. या सगळ्यांची एकूण रक्कमेची बेरीज ११ कोटी २८ लाख ७७ हजार ३८९ रुपये होते.