धन्य सरकार, धन्य प्रशासकीय यंत्रणा, अख्खा टोलनाकाच बोगस निघाला; सुषमा अंधारे यांच्याकडून झाडाझडती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्राची चोहोबाजूंनी कशी लुट चालू आहे. हे संपूर्ण राज्य उघड्या डोळ्याने बघत आहे. सरकार आणि प्रशासन नावाची यंत्रणा आहे की नाही, असा प्रश्न निर्माण होत असताना वर्षभरापासून वाहनधारकाची अक्षरश: लुट करणारा टोलनाकाच आता बोगस निघाला आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या झाडाझडतीत बोगस टोलनाक्याचा पर्दाफाश झाला. तब्बल ६५ तासाचा कालावधी उलटून गेला. सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला अद्यापही महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन उत्तर देवू शकले नाहीत.

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे या रविवारी केज-मांजरसुंबा मार्गे पाटोद्याहून पुण्याकडे प्रवास करत असताना मांजरसुंबा-पाटोदाच्या दरम्यान वैद्यकिन्ही फाट्याच्या आसपास एक टोलनाका आहे. हा टोलनाका पास करत असताना सुषमा अंधारे यांना त्या ठिकाणी काही तरी वेगळ्या हालचाली जाणवल्या. त्यांच्या मनामध्ये संशयाची पाल चुकचुकली. त्यांनी आपल्या गाडीतून खाली उतरून टोलनाक्याच्या संदर्भात चौकशी करायला सुरूवात केली. कोणतीच समाधानकारक उत्तरे मिळत नव्हती. टोलनाक्याच्या परवानगीच्या संदर्भात त्यांनी काही प्रश्न विचारले असता टोलनाक्यावर काम करत असणारे तरूणांचे टोळके पसार झाले. त्या ठिकाणी केवळ एक मॅनेजर उपस्थित होता. मध्यप्रदेशातील रहिवासी असणारा हा मॅनेजर कोणत्याच प्रश्नाचे उत्तरे देवू शकला नाही. त्यांच्याकडे कागदपत्राची पाहणी केली असता टोलनाक्याला परवानगी दिल्याचे कोणतेही डॉक्युमेंट त्यांच्याकडे उपलब्ध नव्हते. मॅनेजरने दाखवलेले डॉक्युमेंट टोलनाक्याचे टेंडर भरले असल्याचे समोर आले. सुषमा अंधारे यांनी टोलनाक्यावरूनच महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला थेट कॉल केला. या टोलनाक्याबद्दल पोलीस प्रशासन अनभिज्ञ होते. गेल्या दिड वर्षापासून हजारो वाहनांची लुट करणार्‍या टोलनाक्याबद्दल महसूल प्रशासनाला किंवा पोलीस प्रशासनाला कोणतीच माहिती नव्हती. टोलनाका बोगस असल्याचे प्रथमदर्शनी समोर आल्यानंतर सुषमा अंधारे यांनी पोलीस प्रशासनाला टोलनाक्याचे सामान जप्त करण्यासाठी बोलावले मात्र दोन तासाचा कालावधी उलटूनही पोलीस तिकडे फिरकले नाहीत. या टोलनाक्याबद्दल सुषमा अंधारे यांनी फेसबुक लाईव्ह करत उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार, तेथील स्थानिक आमदार सुरेश धस यांना काही सवाल विचारले आणि आव्हान दिले. या घटनेला तब्बल ७२ तासांचा कालावधी उलटला. या ७२ तासांमध्ये ना महसूल प्रशासनाकडून काही प्रतिक्रिया आली, ना पोलीस प्रशासनाकडून. दिवसाढवळ्या रोज हजारो वाहनांची लुट करणारा हा टोलनाका बोगस असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर सरकार काय कारवाई करणार असा प्रश्न विचारला जात आहे.

यंत्रणा दिखाव्यासाठी

मांजरसुंबा ते पाटोदा या रस्त्यावर असणार्‍या टोलनाक्यावर सात ठिकाणी टोलनाक्याचे दालन उभे केलेले आहेत. मात्र एकाच ठिकाणाहून टोलची वसुली केली जात होती. बाकीचे सहा जरजर अवस्थेत पडून होते. सगळीकडे धूळ, मध्ये दिखाव्यासाठी कॉम्प्युटर आणि डॅशबोर्ड, टोनाक्यासमोर फास्टटॅगमधून रक्कम वजा झाल्यानंतर येणार्‍या गाडीच्या नंबरचा बोर्ड नव्हता. सगळा टोलनाकाच धूळफेक करणारा होता. गेल्या दिड वर्षापासून या टोलनाक्यावर वाहनांची झालेली वसुली म्हणजे लुटच होती. त्या लुटीचा पर्दाफाश करण्याचे काम एक सजग नागरिक म्हणून शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले.

ठराविक वाहनांसाठी होती सूट

या बोगस टोलनाक्याचा पर्दाफाश होवू नये म्हणून भागातील वाहन धारकांना, व्हीआयपी नागरिकांना सुट दिली जायची. काही जणांकडून टोल न घेता सोडून दिले जायचे तर काही जणांकडून टोलची आकारणी व्हायची. अनेक वेळा फास्टटॅगची यंत्रणा बिघडल्याचे कारण देत रोख टोल वसुली व्हायची. यामागे कोणाचा हात आहे. कोण आहे तो दिवसाढवळ्या वाहनचालकांची लुट करत होता. याची चौकशी होणे गरजेचे आहे.