
पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोलकाता येथील कालीघाट भागात एका दुर्गा पूजा मंडपाचे उद्घाटन करण्यासाठी त्या जात असताना ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी कालीघाट परिसरातील एका दुर्गा पूजा मंडपाचे उद्घाटन करत होत्या. त्यावेळी अचानक एका तरुणीने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या दाव्यानुसार, या महिलेने आधी ममता बॅनर्जी यांची साडी खेचली आणि त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. वेळीच सुरक्षा रक्षकांनी आणि पोलिसांनी हस्तक्षेप करत या महिलेला ताब्यात घेतले. धक्कादायक बाब म्हणजे, या महिलेची झडती घेतली असता तिच्याकडे एक चाकू सापडला.
दिव्य भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, ही महिला नशेच्या अवस्थेत असल्याचा आरोप केला जात आहे. वेळीच सुरक्षारक्षकांनी तिला अडवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी पूजा मंडपाचे उद्घाटन पूर्ण केले. या संपूर्ण प्रकाराबाबत पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून, ही महिला कोण आहे? ती चाकू घेऊन तिथे का आली होती? आणि या हल्ल्यामागचा तिचा नेमका हेतू काय होता? याचा तपास कोलकाता पोलीस करत आहेत.


























































