
मुंबई शहरातील ‘ऑक्टोबर हीट’च्या वाढत्या तीव्रतेचा रेल्वेच्या वाहतुकीवर मोठा परिणाम होऊ लागला आहे. मंगळवारी मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर रुळ प्रसरण पावण्याच्या शक्यतेने घाटकोपर आणि डोंबिवली या दोन ठिकाणी आपत्कालीन ब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे दुपारी मेन लाईनवरील लोकल सेवेचे वेळापत्रक कोलमडले. पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवेच्या वेळापत्रकाचा बोजवारा उडाला आहे. दररोज बहुतांश लोकल फेऱयांना 15 ते 20 मिनिटांचा विलंब होत असून मंगळवारी अनेक लोकल फेऱया रद्द करण्यात आल्या. ऐन पीक अवर्सला रेल्वेच्या नियोजनाचा गोंधळ उडाला आणि प्रवाशांना वाढत्या उकाड्यात गैरसोयीचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
चर्चगेट ते विरारदरम्यान एसी लोकल फेऱया वाढवण्यात आल्या. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या साध्या लोकल गाड्यांवर गदा आली आणि गर्दी, रेटारेटीचा प्रश्न आणखी गंभीर बनला आहे. एसी लोकल फेऱयांचे योग्य नियोजन करण्यात रेल्वे प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचे स्पष्ट होत आहे. सकाळच्या पीक अवर्सला बहुतांश लोकल ट्रेन 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. हे वेळापत्रक बिघडल्यानंतर अनेक फेऱया रद्द करण्याची नामुष्की रेल्वे प्रशासनावर ओढवत आहे. मंगळवारी दिवसभरात अनेक लोकल आयत्या वेळी रद्द करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. वाढत्या उकाड्यात प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर ताटकळत उभे राहण्याचा तसेच धावाधाव करण्याचा त्रास सहन करावा लागला. विशेष म्हणजे, गाड्या रद्द केल्याची उद्घोषणा केली जात नव्हती. काही काळ इंडिकेटर बंद ठेवले जात होते. यातून रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड होत असल्याची नाराजी चर्चगेट येथे गाडीची प्रतीक्षा करणाऱया प्रवाशांनी व्यक्त केली. दरम्यान, मंगळवारी विलेपार्ले आणि खार रोड स्थानकांदरम्यान ‘ट्रेसपासिंग’च्या घटना घडल्याने लोकलसेवेचे वेळापत्रक कोलमडल्याचे रेल्वे अधिकाऱयांनी सांगितले.
दररोजच्या विस्कळीत वेळापत्रकाला वैतागलेले प्रवासी ‘एक्स’च्या माध्यमातून रेल्वे प्रशासन आणि पेंद्रीय मंत्रालय पातळीवर तक्रारी करीत आहेत. त्यावर प्रशासन विलंबाचे खापर प्रवाशांवर पह्डत असल्याचे स्पष्ट होत आहे. एसी लोकलचे दरवाजे बंद करण्यात प्रवासी अडथळे निर्माण करीत असल्याचे स्पष्टीकरण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले.




























































