
”मोदी, शहांना कधी वाटलंच नव्हतं की त्यांच्या छाताडावर पाय लाखो लोकं दिल्लीत येऊन नाचतील. अमित शहांना लाखोंच्या गर्दीत जर आठ हजार लोकं फक्त दिसत असतील तर त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय, ते डिप्रेशनमध्ये गेलेयत”, असा सणसणीत टोला शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शहांना लगावला.
”गृहमंत्री अमित शहा बऱ्याच काळाने काल प्रकट झाले. या देशात आंदोलनं सुरू आहेत. दिल्लीत आंदोलनं सुरू आहेत. लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम निवडणूक आयोगाने केलंय त्या विरोधात ही आंदोलनं सुरू आहेत. या आंदोलनांवर, लोकांच्या आक्रोशावर ज्यांनी आतापर्यंत तोंड बंद ठेवलं होतं ते अमित शहा काल प्रकट झाले आणि म्हणाले की सोमवारचा जो मोर्चा झाला त्यात दीड किलोमीटरच्या क्षेत्रात फक्त आठ हजार लोकं होती. मला वाईट वाटतंय की त्यांची प्रकृती बरी नाही, त्यांना निराशेने ग्रासलंय. लाखोंचा मोर्चाला हे आठ हजार म्हणतात. ही डोकी मोजली कुणी? देशाच्या आरोग्य मंत्रालयाने त्यांच्याकडे एक वैद्यकीय पथक पाठवावं व त्यांची प्रकृती तपासावी”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
”गृहमंत्र्यांच्या मते जर मोर्चात फक्त आठ हजारांची गर्दी होती? मग तुम्हाला भीती का वाटते? आठ हजारांच्या गर्दीसाठी संपूर्ण दिल्लीत अडीच लाख पोलीस का तैनात होते?मोदी शहांच्या घरांच्या आसपासचा पाच किलोमीटरचा परिसर त्यांनी प्रतिबंधित केला होता, हे सर्व कशासाठी? अमित शहा आठ हजारांच्या गर्दीला घाबरले म्हणून जंतरमंतरला टाळे लावले का? ज्यांना लाखोंच्या मोर्चात फक्त आठ हजार दिसतात त्या अमित शहांचे डोळे नॅशनल म्युझियममध्ये ठेवले पाहिजे, असा टोला देखील त्यांनी लगावला.




























































