
कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्यावर झालेल्या कारवाईवरून राजकीय वातावरण तापले आहे. त्यांच्या अटकेवरून शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. आपल्याच देशात तरुणांनी तिरंगा हातात घेणे हा गुन्हा कधीपासून झाला?” असा संतप्त सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
जंतरमंतर येथे तिरंगा फडकवल्याप्रकरणी मंगळवारी दिल्ली पोलिसांनी सौरव दास आणि आशुतोष रांका यांना अटक केली. बुधवारी त्या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची पाच दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
याबाबत आदित्य ठाकरे यांनी एक ट्विट करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. “जंतरमंतरवर तिरंगा फडकवल्याबद्दल पोलिसांनी सौरव दास व आशुतोष रांका यांना तुरुंगात डांबले आहे. आपल्याच देशात, हिंदुस्थानी तरुणांनी तिरंगा फडकवणे हा गुन्हा कधीपासून झाला? जोपर्यंत आपल्या देशातील हुकूमशाही मोडून काढून लोकशाही पुन्हा आणत नाही तोपर्यंत सत्ताधारी विरुद्ध देशभक्त तरुण हा संघर्ष असाच सुरू राहील.” असे आदित्य ठाकरे यांनी ट्विटमधून म्हटले आहे.




























































