सिक रजेच्या वेतन मंजुरीसाठी मागितली 35 हजारांची लाच; वरिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्य़ात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिक रजेचे थकीत वेतन बिल तयार करून ते मंजुरीसाठी ट्रेझरीमध्ये पाठविण्यासह बिल मंजूर करून घेण्यासाठी 35 हजार रुपयांची लाच मागणाऱया नायगाव पोलीस मुख्यालयातील वरिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. बद्रीनाथ थोरवे (40) असे या लोकसेवकाचे नाव आहे.

तक्रारदार हे 294 दिवस सिक रजेवर होते. या काळात त्यांचे वेतन बंद करण्यात आले होते. रजेवरून पुन्हा कामावर हजर झाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यांच्या 248 दिवसांच्या सिक रजेला मंजुरी देण्यात आली, तर उर्वरित रजा विनावेतन करण्यात आली. मंजूर झालेल्या रजेच्या दिवसांचे थकीत वेतन बिल तयार करून ते ट्रेझरीमध्ये पाठविणे आणि बिल मंजूर करून घेण्याच्या कामासाठी वरिष्ठ लिपिक थोरवे यांनी तक्रारदाराकडे 35 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी 10 हजार रुपये त्यांनी यापूर्वीच पह्न-पेद्वारे स्वीकारले होते.

लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार मंगळवारी सापळा रचण्यात आला. या कारवाईदरम्यान थोरवे यांना मागणी केलेल्या लाचेपैकी दुसऱया हप्त्याचे पाच हजार रुपये स्वीकारताना त्यांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले.