
माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य व्यवस्थेला काळिमा फासणारा संतापजनक प्रकार समोर आला आहे. शाळेत अचानक फीट येऊन बेशुद्ध पडलेल्या एका ११ वर्षांच्या मुलीला उपचारासाठी आणले असता, रुग्णवाहिकेच्या डिझेलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून तिला व तिच्या हतबल वडिलांना रुग्णवाहिकेतून खाली उतरवण्यात आले, या घटनेने राज्याच्या आरोग्य विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तालुक्यातील दिंद्रुड गावातील जिल्हा परिषद शाळेत पाचवीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीला २९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता अचानक फीट आली. ती बेशुद्ध पडल्याने शाळेचे मुख्याध्यापक मनोहर कटारे आणि सहकाऱ्यांनी तिला तातडीने दिंद्रुड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश ढाकणे यांनी तिला पुढील उपचारासाठी रेफरचा सल्ला दिला.
या मुलीचे आईचे छत्र हरपले असून, तिचे वडील हमाली करून दोन मुले व दोन मुलींचा सांभाळ करतात. वृद्ध आजी या मुलांची देखभाल करते. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत राहणारे हे कुटुंब रुग्णवाहिकेसाठी गयावया करत होते. मुलीची अवस्था गंभीर असल्याने हतबल वडिलांनी पोटच्या गोळ्याला खांद्यावर उचलून रुग्णवाहिकेत बसवले. परंतु, आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे डिझेलच्या पैशांची मागणी केली. रोज मजुरी करून पोट भरणाऱ्या या कुटुंबाकडे पैसे नसल्याने त्यांना थेट रुग्णवाहिकेतून खाली उतरवले. यावेळी भावनिक झालेल्या आजीने ‘आमच्याकडे खायलाच पैसे नाहीत, मग डिझेलला कुठून आणून देऊ? चार लेकरांचा सांभाळ कसाबसा करतोय,’ असे सांगून डॉक्टरांना विनंती केली. त्यावर समोर उभ्या असलेल्या डॉक्टराने अत्यंत बेजबाबदार व उद्धटपणे सांभाळ होत नाही तर.., असे म्हणून अत्यंत खालच्या पातळीवरील शब्द वापरले.
यावेळी हतबल झालेल्या बापाने आपल्या बेशुद्ध लेकराला पुन्हा खांद्यावर टाकून, वृद्ध आईला सोबत घेऊन रुग्णालयाच्या बाहेर चालत नेले. आरोग्य केंद्रातील सर्व डॉक्टर आणि कर्मचारी हा भयानक प्रकार मूकप्रेक्षक बनून पाहत होते. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर जिल्हाभरातून या निष्ठुर गारोग्य कर्मचाऱ्यांवर आणि डॉक्टरांवर कडक कारवाईची मागणी होत आहे.
चौकशीची नोटीस
या प्रकरणी आपण स्वतः प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट देऊन संबंधित रुग्णवाहिका चालक व संबंधित वैद्यकीय अधिकारी यांना झालेल्या प्रकाराबद्दल नोटीस बजावली असून त्याचे उत्तर देण्याचे कळवले आहे तसेच या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समिती चौकशीला येत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मधुकर घुबडे यांनी दिली.





























































