दारू तस्करांच्या पाठलागावर असलेल्या पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार; कॉस्टेबलचा मृत्यू, नालंदा जिल्ह्यातील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नालंदा जिल्ह्यात दारू तस्करांविरुद्धच्या एका कारवाईदरम्यान अत्यंत खळबळजनक घटना घडली आहे. दारू तस्करांनी केलेल्या बेछूट गोळीबारात उत्पादन शुल्क विभागाचे कॉन्स्टेबल अजित कुमार गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून, या घटनेमुळे पोलीस आणि उत्पादन शुल्क वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत आहे. बुधवारी रात्री पावापुरी-सिलाव भागातील महामार्गावर हा थरार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, पाटणा येथील उत्पादन शुल्क गुप्तचर विभागाला एका पिकअप व्हॅनमधून नालंदा जिल्ह्यात दारूचा मोठा साठा आणला जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. हा साठा खरात मोरमार्गे नालंदाच्या दिशेने जात होता. या माहितीच्या आधारे पाटण्याच्या ईआयबी पथकाने, राजगीर उत्पादन शुल्क विभागातील उपनिरीक्षकासह स्थानिक पथकाला सोबत घेऊन तातडीने कारवाईची मोहीम हाती घेतली. या पथकाने संशयित पिकअप वाहनाचा पाठलाग करून त्याला थांबवण्याचा व घेराव घालण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान, पावापुरी-सिलाव भागातील महामार्गावरील एका उड्डाणपुलाजवळ अचानक गोळीबार सुरू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, दारू तस्करांची टेहळणी करणाऱ्या एका इसमाने पथकावर थेट गोळी झाडली. या गोळीबारात कॉन्स्टेबल अजित कुमार यांना गोळी लागल्याने ते जागेवरच कोसळून गंभीर जखमी झाले. गोळीबारानंतर घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला. या परिस्थितीचा फायदा घेत दारू तस्कर आणि कथित भाडोत्री सैनिक पिकअप गाडीसह घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच उत्पादन शुल्क अधीक्षक संजय कुमार चौधरी यांनी या बातमीला दुजोरा देत तातडीने पावले उचलली. जखमी कॉन्स्टेबल अजित कुमार यांना तात्काळ उपचारासाठी पावापुरी येथील भगवान महावीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये दाखल करण्यात आले. तेथील प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पाटणा येथील पीएमसीएचमध्ये हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान दुर्दैवाने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर त्यांचे शवविच्छेदन पाटणा येथे करण्यात येत आहे.

उत्पादन शुल्क स्टेशन प्रमुख नितीश कुमार यांनी स्पष्ट केले की, ही विशेष मोहीम पाटणा ईआयबीच्या विशेष पथकाच्या मार्गदर्शनाखाली राबवली जात होती. या प्राणघातक हल्ल्यानंतर उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हा पोलिसांनी संयुक्तपणे हल्लेखोरांचा शोध तीव्र केला आहे. आरोपींची ओळख पटवून त्यांना जेरबंद करण्यासाठी महामार्ग आणि आजूबाजूचे सर्व रस्ते बंद करून कसून शोधमोहीम आणि छापेमारी सुरू आहे.