
उत्तराखंडमधील बहुचर्चित अंकिता भंडारी हत्याकांड प्रकरण पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले असून, या प्रकरणी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी दिल्लीतील इंडिया गेटवर धरणे आंदोलनाला बसलेल्या अंकिताच्या आई-वडिलांना पहाटे 4च्या सुमारास संपूर्ण जग झोपले असताना बळजबरीने ताब्यात घेण्यात आले. या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त करत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारवर हल्लाबोल केला आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या ‘एक्स’ हँडलवर पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, ‘पहाटे 4 वाजता, संपूर्ण जग झोपले असताना, अंकिता भंडारीच्या आई-वडिलांना ताब्यात घेण्यात आले. त्यांचा गुन्हा काय होता? ते इंडिया गेटवर शांतपणे बसले होते—कोणत्याही त्रासाशिवाय, खांदे पाडून, त्यांची एकच मागणी होती की सीबीआयचा तपास पूर्ण होईपर्यंत दुष्यंत गौतम यांची सिक्कीमच्या राज्यपालपदी नियुक्ती करू नये.’
सुबह के 4 बजे। जब दुनिया सो रही थी, तब अंकिता भंडारी के माता-पिता को हिरासत में ले लिया गया।
उनका गुनाह? वे इंडिया गेट पर चुपचाप बैठे थे – बोझिल कंधों के साथ, बिना किसी हंगामे के और सिर्फ़ इतना माँग रहे थे कि CBI जाँच पूरी होने तक दुष्यंत गौतम को सिक्किम का राज्यपाल न बनाया जाए।
कल मैं और प्रियंका इन माता-पिता से मिले थे।
जिस जाँच का नतीजा आया नहीं, उसके पहले ही नियुक्ति की जल्दी और सवाल पूछने वाले माँ-बाप को रात के अंधेरे में उठा लिया गया।
इस सरकार की पहचान यही है: पीड़ितों की आवाज़ दबा दो, सवाल करने वालों को हटा दो।पर न्याय की लड़ाई न दबेगी, न रुकेगी।
कांग्रेस अंकिता भंडारी के परिवार के साथ खड़ी है, और खड़ी रहेगी – जब तक उन्हें न्याय नहीं मिलता।#JusticeForAnkitaBhandari
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 15, 2026
पुढे बोलताना राहुल गांधींनी काल घडलेल्या भेटीचा संदर्भ देत सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, ‘मी आणि प्रियांका गांधी काल अंकिताच्या आई-वडिलांना भेटलो होतो. ही भेट झाल्यानंतर तपासाचा अहवाल जाहीर होण्यापूर्वीच ही कारवाई घाईघाईने करण्यात आली आणि ज्या आई-वडिलांनी प्रश्न विचारले, त्यांचे रात्रीच्या अंधारात अपहरण करण्यात आले. पीडितांचा आवाज दाबणे आणि प्रश्न विचारणाऱ्यांना हुडकून बाजूला सारणे, हे या सरकारचे प्रमुख वैशिष्ट्य बनले आहे. मात्र, न्यायासाठीचा हा लढा कधीही दाबला जाणार नाही आणि थांबवलाही जाणार नाही. काँग्रेस पक्ष अंकिता भंडारीच्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत राहू,” असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे.
काय आहे प्रकरण?
दरम्यान, अंकिता भंडारी ही ऋषिकेश जवळील वनंत्रा रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. १८ सप्टेंबर २०२२ रोजी रिसॉर्टचा मालक पुलकित आर्य याने त्याचे दोन कर्मचारी सौरभ भास्कर आणि अंकित गुप्ता यांच्या साथीने अंकिताची निर्घृण हत्या केली होती. घटनेच्या चार दिवसांनंतर तिचा मृतदेह चीला कालव्यातून सापडला होता. या प्रकरणी न्यायालयाने तिन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
मात्र गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भाजपचे माजी आमदार सुरेश राठोड आणि स्वतःला त्यांची पत्नी म्हणवून घेणारी अभिनेत्री उर्मिला सनावर यांच्यातील संभाषणाची एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. यानंतर अंकिता हत्याकांडातील व्हीआयपी अँगल मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला. या प्रकरणी काँग्रेससह अनेक राजकीय आणि सामाजिक संघटनांनी सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी सातत्याने आंदोलने केली. ज्यामध्ये अंकिताचे पालकही सहभागी झाले होते. वाढता दबाव पाहता या वर्षी जानेवारीत मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी अंकिताच्या पालकांची भेट घेऊन या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची शिफारस केली होती.


























































