एका गुणानं सुवर्ण हुकलं, पण कोल्हापूरच्या पठ्ठ्यानं इतिहास रचला; जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत विश्वजीत मोरेनं रौप्यपदक पटकावलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूरचा पठ्ठ्या विश्वजीत मोरे यांना अमेरिकेत इतिहास घडवला आहे. लास वेगास येथे सुरू असलेल्या 23 वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत विश्वजीत मोरे याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पुरुषांच्या 55 किलो वजनी गटातील ग्रीको-रोमन प्रकारात विश्वजीत याने रौप्यपदक पटकावले. या स्पर्धेच्या इतिहासात ग्रीको-रोमन प्रकारात रौप्यपदक जिंकणारा विश्वजित हिंदुस्थानचा पहिला कुस्तीपटू ठरला आहे. अंतिम फेरीत जॉर्जियाच्या कोबा कारुमिद्झे याच्याकडून त्याला 12-13 असा निसटता पराभव स्वीकारावा लागला.

विश्वजितने स्पर्धेची सुरुवात मेक्सिकोच्या इसाक मारिन माता याच्याविरुद्ध 10-8 अशा विजयाने केली. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत त्याने विद्यमान 20 वर्षांखालील विश्वविजेता इराणच्या आर्मिन शम्सिपूरचा 8-1 असा पराभव केला. उपांत्य फेरीत रशियाच्या मलिक गिगिएव्हला 7-4 असे नमवत त्याने अंतिम फेरी गाठली.

अंतिम सामन्यात विश्वजितने सुवर्णपदकासाठी जोरदार लढत दिली. मात्र, शेवटच्या काही सेकंदांत कारुमिद्झेने आघाडी घेत विजेतेपदावर नाव कोरले. अंतिम फेरीत प्रवेश करून विश्वजितने यापूर्वीच इतिहास घडवला होता. याआधीच्या स्पर्धांमध्ये त्याने कांस्यपदके जिंकली होती.

कांस्यपदकासाठी हिंदुस्थानी पहिलवान लढणार

महिलांच्या गटात कोमलला उपांत्य फेरीत युक्रेनच्या अलिना फिलिपोविचकडून तांत्रिक वर्चस्वाच्या आधारे पराभव पत्करावा लागला. त्यामुळे तिच्या कांस्यपदकाच्या आशा कायम आहेत. दीक्षा मलिकही 68 किलो गटात कांस्यपदकाच्या शर्यतीत आहे. मात्र, मानसी लाठेरला इटलीच्या लॉरा गोडिनोकडून 9-10 असा पराभव स्वीकारावा लागला. दरम्यान, व्हिसा नाकारल्यामुळे हिंदुस्थानच्या तयारीलाही फटका बसला. ग्रीको-रोमन आणि महिला गटातील नऊ कुस्तीपटूंना व्हिसा नाकारण्यात आला. संबंधित खेळाडू 20 वर्षांखालील असून पूर्णवेळ नोकरी करत नसल्याचे कारण देण्यात आले.