
उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत जोरदार निशाणा साधला आहे. ‘यंदा भाजपचा पराभव होणारच नाही, तर भाजपच्या नेत्यांना पळूनही जावे लागेल. यावेळी भाजपची हंडी फुटणार,’ असा घणाघात त्यांनी केला. निवडणूक आयोग आणि भाजप मिळून देशातील नागरिकांची फसवणूक करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
आज तक ने दिलेल्या वृत्तानुसार अखिलेश यादव यांनी समाजवादी पक्ष आणि ‘पीडीए’ परिवाराची ताकद दिवसेंदिवस वाढत असल्याचा दावा केला. पीडीए म्हणजे पिछडे, दलित आणि अल्पसंख्याक या घटकांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, या घटकांवरील अन्याय, अत्याचार आणि अपमान वाढत असला, तरी त्यामुळे हा परिवार अधिक मजबूत होत आहे. पीडीएची वाढती ताकद रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत अखिलेश यादव यांनी सांगितले की, समाजवादी पक्षाचे ‘पीडीए प्रहरी’ प्रत्येक विधानसभा मतदारसंघात बनावट मतदारांची तपासणी करत आहेत. ज्या ठिकाणी भाजपचा पराभव निश्चित असल्याचे दिसते, तिथेच मतांची सर्वाधिक लूट होत असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणूक कर्तव्यावर नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये पीडीए परिवारातील एकही व्यक्ती नसल्याचा दावाही त्यांनी केला.
शांततापूर्ण आंदोलनाच्या मुद्द्यावरही अखिलेश यादव यांनी आपली भूमिका मांडली. लोकशाहीमध्ये मोर्चा काढणे, धरणे आंदोलन करणे आणि शांततेच्या मार्गाने आपले म्हणणे मांडणे हा प्रत्येकाचा अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले. या अधिकारांवर गदा आणण्याचा प्रयत्न होता कामा नये, असेही ते म्हणाले.



























































