
> राजेश चुरी
एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पाऊस कमी झाल्याने मुंबईकरांनी पाण्याचा जपून वापरा करण्याचे आवाहन मुंबई महानगर पालिकेने केले आहे. सध्याची पाणी टंचाई लक्षात घेऊन महापालिकेने मुंबईत दहा टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पण दादर शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या समोरील स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरील पालिकेची मुख्य भूमिगत पाईपलाईन फुटली आहे. त्यामुळे दररोज हजारो शेकडो लिटर पिण्याचे पाणी वाया जात आहे. दररोज संध्याकाळी या विभागाला पालिकेचा पाणी पुरवठा सुरु झाल्यावर भूमीगत पाईपलाईनमधून वेगाने पाणी सावरकर मार्गावर पसरते. सिमेंटच्या रस्त्यावर पाणी साचल्यामुळे अपघाताचाही मोठा धोका आहे. सावरकर मार्ग हा मुख्य रस्ता असल्याने वाहनांची प्रचंड वर्दळ असते. मागील सहा ते आठ महिन्यांपासून भूमिगत पाईपलाईनमधून पाण्याची गळती होत आहे. सध्या मुंबईला ४१०० दशलक्ष लिटर्स पाणी पुरवठा होतो. सध्या मुंबईला ४६०० दशलक्ष लिटर्स पाण्याची गरज आहे. सध्या दररोज ५०० ते ५०० दललक्ष लिटर्स पाणी गळती व चोरीमुळे वाया जाते. मुंबईकरांनी पाण्याचे महत्व ओळखून पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन महापालिकेने केले आहे. पाण्याचा गैरवापर केल्यास कारवाईचाही इशारा दिला आहे असे असताना शिवाजी पार्क परिसरात दररोज लाखो शेकडो लिटर्स पिण्याचे पाणी खुलेआम वाया जात आहे.




























































