
भावी पत्नीसोबत अलिबागच्या वरसोली येथील एका लॉजवर आलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान या तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
मुरुड तालुक्यातील 25 वर्षीय तरुण आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत वरसोली समुद्रकिनारी फिरण्यास आला होता. वरसोली येथील एका लॉजवर त्यांनी रूम आरक्षित केली होती. याठिकाणी वास्तव्यास असताना तरुणाचा अकस्मात मृत्यू झाला. त्यानंतर सोबतच्या तरुणीने तरुणाचा मृतदेह सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास जिल्हा रुग्णाल यात आणला. यावेळी तरुणाचे नातेवाईक ही रुग्णालयात पोहोचले. नातेवाईकांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करायचे नाही असे सांगून मृतदेह घेऊन गेले. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून मुलाचा मृतदेह पुन्हा रुग्णालयात आणला. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून शवविच्छेदन करून नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिल्ग, असे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी सांगितले तर शवविच्छेदन आणि बिसेरा रिपोर्ट प्राप्त झाल्याबरच मुलाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकेल, असे अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी यांनी दिली.
अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा
तरुणाच्या संशयास्पद मृत्यूनंतर मृतदेह अपघात विभागात आणण्यात आला होता. हा मृत्यू संशयास्पद असल्याने त्याची तातडीने वर्दी पोलिसांना देणे आणि मृतदेहाचे शवविच्छेदन करून घेणे आवश्यक होते. मात्र यावेळी अपघात विभागात कार्यरत असलेल्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला, अधिकाऱ्यांचा हा बेजबाबदारपणा लक्षात येताच धावाधाव सुरू झाली.





























































