
ज्येष्ठ लेखक सुरेश पाटील यांची ‘हिंदण’ ही कादंबरी मिहाना प्रकाशनाकडून प्रकाशित होत आहे. सत्ता आणि सामर्थ्य हे कथाबीज असलेल्या कादंबरीतील हे संक्षिप्त प्रकरण.
मोहनलाल यांना झालेली अटक. त्याविरुद्ध जनविकास पार्टीकडून राज्यात सुरू असलेलं आंदोलन. राज्यात जनविकास पार्टीची सत्ता आली, पिकली तरी ते सुरू होतं. त्याला जनसामान्यांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याने केंद्रावरील दबाव वाढलेला. केंद्र सरकारने ‘बेडी’च्या माध्यमातून मोहनलाल यांच्या उद्योगधंद्यांवर धाडी टाकल्या होत्या, परंतु त्यामधून ठोस असं काही हाती लागलं नव्हतं. ‘बेडी’च्या तडाख्यातून जनविकास पार्टीचं पक्ष कार्यालयही सुटलं नव्हतं. मात्र तिथंही तपास यंत्रणांचा मुखभंग झालेला.
निखिल धावडा यांचा समावेश राज्य मंत्रिमंडळात असला तरी जनविकास पार्टीचे ते तत्कालीन कोषाध्यक्ष. त्यांनी जनविकास पार्टीकडून वर्धन याला पक्षकार्यासाठी पाच कोटी रुपये दिले, परंतु त्यानं काम न करता फसवणूक केली अशी तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली होती. त्यामुळे मोहनलाल यांचं नाव तसं सुरुवातीपासूनच बाजूला पडलं होतं, परंतु आर्थिक तपास यंत्रणा हे मानायला तयार नव्हती. मोहनलाल यांच्या कस्टडीत वाढ करावी अशी ‘बेडी’ची मागणी असतानाही न्यायालयाने कडक भूमिका स्वीकारली आणि पुराव्यांची मागणी केली. ‘एखाद्या व्यक्तीला नुसतं संशयावरून किती काळ कोठडीत ठेवायचं?’ हा न्यायालयाचा प्रश्न. शिवाय न्यायालयानं ‘बेडी’च्या तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्यांना धारेवर धरलं. न्यायालयात पुरावे सादर करण्यात तपास यंत्रणेला अपयश आलं. जनविकास पार्टीकडून अवघ्या पाच कोटी रुपयांचा दावा करण्यात आला, तरी तेही वर्धननं कबूल केलं नव्हतं.
न्यायालयाने अखेर मोहनलाल यांना जामीन मंजूर केला अन् जनविकास पार्टीच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर जल्लोष केला. सोहनलाल यांचे चिरंजीव मणीलाल हे राज्याचे मुख्यमंत्री. त्यांनी तर मंत्रिमंडळासह पक्षातील वरिष्ठ नेत्यांना पार्टी दिली! शिवाय चुलते मुख्यमंत्री व्हावे यासाठी राजीनामा देणार असल्याचंही जाहीर केलं. त्यामुळे त्याचं राजकीय वजन झटकन वाढलं. मणीलाल याचा विचार स्तुत्य असला तरी मोहनलाल यांनी त्यास नकार दिला अन् आपण बंधू सोहनलाल यांच्यासारखंच पक्षकार्याला वाहून घेणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे मोहनलाल यांचीही प्रतिमा अधिकच उंचावली, परंतु आज ना उद्या मोहनलाल हे सत्तारूढ होण्याची इच्छा व्यक्त करतील आणि त्यावरून जनविकास पार्टीमध्ये जोरदार संघर्ष होईल असा विश्वास राष्ट्रीय लोकशाही दलास होता.
लोकसभेची निवडणूक जवळ आलेली अन् हातातलं एक महत्त्वाचं राज्य गेलं. साहजिकच केंद्र सरकारनं ‘बेडी’स अधिक क्रियाशील केलं. ‘बेडी’नं एखाद्या पक्षातील प्रभावी नेत्याची चौकशी सुरू करावी आणि त्यानं लोकशाही दलात प्रवेश केल्यानंतर ती ठप्प व्हावी, हे राज्यातील जनतेच्या सवयीचं झालेलं. या ससेमिऱ्यातून राज्याचे गृहमंत्री तानाजी तापट, दुसरे मंत्री दिगंबर भोपळे, शंकरराव आंबट हेही गेले, पण त्यांनी ‘बेडी’लाही दाद दिली नाही. साहजिकच जनतेच्या नजरेतील ते ताईत ठरले अन् त्याचं फळ त्यांना निवडणुकीत मिळालं. दरम्यान, वर्धनची मुंदाई शहरातील मोठी प्रॉपर्टी ‘बेडी’च्या हाताला लागली. समुद्रकिनारी असलेली मालमत्ता. त्यामध्ये स्विमिंग पूलपासून आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असलेला आलिशान बंगला. बंगल्यासमोर उभ्या असलेल्या रोल्स रॉयस, फेरारी, रेंज रोव्हर, मॉरिस गॅरेज, लॅम्बॉर्गिनी, बेंटले, बीएमडब्ल्यू, पोर्शे, मर्सिडिस आदी महागड्या ब्रँड्सच्या सतरा गाड्यांचा ताफा. हाताला लागलेलं हे घबाड पाहून ‘बेडी’च्या अधिकाऱ्यांचे डोळे विस्फारले. ही प्रॉपर्टी ‘रिया हर्षवर्धन’ या नावाने खरेदी करण्यात आलेली. ही रिया कोण, हा प्रश्न तपास अधिकाऱ्यांना पडला. साहजिकच या नावाचा छडा लागत नाही तोपर्यंत हे नाव घोषित करायचं नाही, असं त्यांनी ठरवलं. त्यांचं हे मौन अनेक प्रश्नांची उत्तरं देऊन जाईल, अशी त्यांना आशा.
एखादा इसम आपण केंद्रीय गृहमंत्र्याचे नातेवाईक असल्याचा, माजी मुख्यमंत्र्याचा नातू असल्याचा बहाणा करतो अन् आपल्याला पंचाऐंशी कोटींस गंडा घालतो ही गोष्ट मोहनलाल यांच्या मनात रुतलेली. एखाद्या करटीसारखी ती वेदना देत होती. मोहनलाल केंद्रीय तपास यंत्रणेच्या कोठडीत होते. त्या वेळी वर्धनचा सूड घेण्यासाठी शंकर पोरवा हे आमदार आसुसले होते, परंतु मोहनलाल यांनी पोरवा व इतरांनाही सबुरीचं धोरण अवलंबण्यास सांगितलेलं. एकतर ते आत होते अन् वर्धनचा प्रश्नही केंद्र सरकारच्या अखत्यारीत पोहोचलेला. अशा वेळी काही गडबड होऊन चालणार नव्हतं. एकतर त्यांचा पराभव करून जनविकास पार्टीने राज्याची सत्ता हस्तगत केली होती. साहजिकच केंद्र सरकारची स्थिती दुखावलेल्या मांजरासारखी झालेली. अशा वेळी केंद्राला संधी दिली तर ते त्या मांजरासारखंच आपला गळा पकडायलाही कमी करणार नाहीत याची त्यांना चांगलीच जाण. ते संकट आता टळलेलं. सध्या ते बाहेर होते अन् आता वर्धनकडे पाहायला हरकत नाही अशा निर्णयाप्रत आलेले.
शंकर पोरवा हे कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असलेल्या राज्य देवस्थान समितीचे अध्यक्ष. ते अधूनमधून मोहनलाल यांच्या भेटीस यायचे. आजही ते आलेले. त्यांचं मोहनलाल यांच्यावर दांडगं प्रेम. गडी मनानं चांगला, पक्षासाठी झोकून देणारा, पण भावनाशील हे मोहनलाल यांचं मत.
“दादा, खुरववाडीच्या झाडोबा देवस्थानला जायचं आहे. तुम्ही येणार आहात का?” शंकरनं विचारलं.
“नको. सरकारी पाहुणचारातून नुकताच बाहेर आलो आहे. तू पाहत आहेसच, सगळी कामं कशी खोळंबली आहेत अन् अचानक तुला झाडोबाची याद आली?”
“तिथं आपल्या पक्षाचा गजानन तांबवे नावाचा हरहुन्नरी कार्यकर्ता आहे. विश्वासू आणि बिनधास्त आहे. तसा बिल्डर आहे तो! त्याचं झाडोबाला या असं सातत्यानं टुमणं आहे.”
“विरोधी उमेदवारानं अर्जात गडबड केल्यानं आमदारकी हुकलेला तर नव्हे?”
“तोच तो. त्याची बायको नगरसेविका आहे. या वेळी तो आमदार झाला असता, परंतु ती जागा सोहनलाल अंकलना आपल्या मित्राला द्यायची होती. मात्र गजाभाऊनं त्यांनाही निवडून आणलं. देवस्थान कमिटीकडून झाडोबाचा विकास व्हावा अशी त्याची इच्छा आहे.”
“करून टाका. एकदा जनतेच्या हातात टाळ आले की, सत्ताधाऱ्यांना बरं असतं. जनता देवाकडे पाहत राहते, देव त्यांच्याकडे अन् इकडं आपणच.” मोहनलाल हसले. “बाकी तुझ्या त्या गजाभाऊला सांग, लवकरच विधान परिषदेवर तुझी वर्णी लावतो. अशा प्रामाणिक माणसांची आपल्याला गरज आहे.”
शंकर त्यांच्या जवळ सरकत म्हणाला, “दादा, खूपच चांगला निर्णय हा! अन् त्या वर्धनचं काय करायचं?”
“बाप्पा मोरया! फार फार तर दहा दिवसांनी आपण गणपती बाप्पाचं विसर्जन करतो. यंदा तू गणपती बसवला नाहीस का?” मोहनलाल हसले.
“बसवलेला.” शंकरही हसला. मोहनलाल यांना काय म्हणायचं आहे, ते त्याला कळलं.


























































