
>> स्वप्नील साळसकर, [email protected]
पावसाळा ओसरू लागला की, कोकणातील अनेक पठारे जणू निसर्गाच्या कुंचल्यातून साकारलेल्या चित्रासारखी दिसू लागतात. मात्र यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने या निसर्गचित्रातील रंगच फिके पडले आहेत. अनेक माळरानांवर फुलणाऱ्या रानफुलांची संख्या मोठय़ा प्रमाणात घटली असून काही ठिकाणी तर नेहमी दिसणारी फुले यंदा गायब झाली.
निसर्गदेवतेने दोन्ही हाताने भरून दिलेले सृष्टीसौंदर्य म्हणजे कोकण. मात्र पावसाळय़ानंतर पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेला रानफुलांचा रंगोत्सव यंदा फिका पडला आहे. वेंगुर्ले तालुक्यातील खवणे, म्हापण, कणकवली तालुक्यातील तरंदळे, भरणी, मिनी कास पठार म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूर-सिंधुदुर्गच्या सीमेवरील विस्तीर्ण रांगणागडाच्या परिसरात पाहावयास मिळणारी रंगीबेरंगी फुलांची झलक यंदा लवकरच कोमेजून गेली.
कोकण म्हटले की, डोळय़ांसमोर उभे राहतात ते हिरवेगार डोंगर, खळाळणारे ओहोळ, धुक्याची चादर आणि पावसाळय़ानंतर माळरानांवर उमलणारी असंख्य रंगीबेरंगी रानफुले. पावसाळा ओसरू लागला की, कोकणातील अनेक पठारे जणू निसर्गाच्या कुंचल्यातून साकारलेल्या चित्रासारखी दिसू लागतात. मात्र यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने या निसर्गचित्रातील रंगच फिके पडले आहेत. अनेक माळरानांवर फुलणाऱया रानफुलांची संख्या मोठय़ा प्रमाणात घटली असून काही ठिकाणी तर नेहमी दिसणारी फुले यंदा गायब झाली.
दरवर्षी पावसाच्या सरींनी माती ओली झाली की, कोकणच्या माळरानांवर निसर्गाचा एक अनोखा उत्सव सुरू होतो. काही दिवसांसाठी का होईना, परंतु हिरव्या गवताच्या कुशीत असंख्य छोटय़ा-छोटय़ा फुलांचा बहर येतो. वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण येथील पठार हे अशाच नैसर्गिक फुलोत्सवासाठी ओळखले जाते. मात्र यंदा परिस्थिती वेगळी आहे. कमी पावसामुळे जमिनीमध्ये आवश्यक ओलावा निर्माण झाला नसल्यामुळे रानफुलांच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार झाले नाही. पठारावर दरवर्षी दिसणारा फुलांचा सडा यंदा अत्यंत विरळ झाला आहे.
रानफुलांचे आयुष्य तसे अल्प असते. पावसाच्या काही सरी, जमिनीतील पुरेसा ओलावा आणि अनुकूल वातावरण मिळाले की ही फुले उमलतात आणि काही दिवसांतच पुन्हा निसर्गात विलीन होतात. त्यामुळे त्यांचा प्रत्येक बहर हा विशेष असतो. दरवर्षी या फुलांची छायाचित्रे टिपण्यासाठी, निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी आणि माळरानाचा हा रंगोत्सव पाहण्यासाठी निसर्गप्रेमी पठारांकडे धाव घेतात. यंदा मात्र त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. ज्या माळरानावर दरवर्षी हजारो छोटय़ा फुलांचा नजराणा मानवी डोळय़ांना तृप्त करतो, तेच माळरान यंदा काहीसे उदास आणि ओसाड भासत आहे.
रानफुले केवळ सौंदर्य नव्हे, जैवविविधतेची ओळख. ती केवळ डोळय़ांना आनंद देणारी नाजूक फुले नाहीत. तर कोकणच्या समृद्ध जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग आहेत. या फुलांवर अनेक प्रकारचे कीटक, फुलपाखरे आणि मधमाशा अवलंबून असतात. त्यामुळे रानफुलांची संख्या कमी होणे हा केवळ सौंदर्याचा विषय नसून स्थानिक परिसंस्थेतील बदलाचा संकेत आहे. सोनकी, तेरडा, तेरडय़ाच्या विविध जाती, कंदीलपुष्प, रानतेरडा, जांभळी रानफुले, पांढरी रानफुले, करवंदाच्या फुलांसारखी नाजूक फुले, भुईचाफा, रानचाफा, अभाळी आणि विविध प्रकारच्या ऑर्किड्स यामुळे माळरानांचे रूपच पालटून जाते. काही फुले पिवळय़ा रंगाची उधळण करतात, जांभळ्या-पांढऱया रंगांनी माळरान सजते, तर काही अगदी नजरेत न भरणाऱया आकाराची असूनही जवळून पाहिल्यावर त्यांच्या सौंदर्याची वेगळीच अनुभूती देतात.
कोकणच्या समृद्ध जैवविविधतेचा उत्सव
यंदा कमी पावसामुळे माणसांच्या डोळय़ांना तृप्त करणारा रानफुलांचा नजराणा पाहायला मिळाला नाही. मात्र पुढील वर्षी पावसाच्या सरी वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात बरसाव्यात, माती पुन्हा ओलाव्याने समृद्ध व्हावी आणि म्हापण येथील पठारासह संपूर्ण कोकणातील माळराने पुन्हा असंख्य रानफुलांनी बहरून जावीत, अशी अपेक्षा प्रा. प्रभू यांनी व्यक्त केली. या फुलांचा बहर म्हणजे केवळ निसर्गाचे सौंदर्य नाही; तो कोकणच्या जिवंतपणाचा, समृद्ध जैवविविधतेचा आणि निसर्गाशी असलेल्या आपल्या नात्याचा रंगीबेरंगी उत्सव आहे.


























































