बँका मजबूत झाल्या आहेत तर खात्यातून पैसे का कापले जात आहेत? अखिलेश यादवांचे केंद्र सरकारला १२ सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी बँकिंग व्यवस्थेच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत त्यांनी मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळाला अनुसरून बँकिंग व्यवस्थेवर बारा वर्षे, बारा प्रश्न उपस्थित केले आहेत. बँका मजबूत झाल्याचा दावा सरकार करत असेल, तर सामान्य जनतेला अजूनही अनेक अडचणींचा सामना का करावा लागतोय, असा सवाल त्यांनी केला आहे.

अखिलेश यादवांनी विचारलेले १२ प्रश्न खालीलप्रमाणे:

१. बँका मजबूत झाल्या आहेत तर मग त्या विकल्या का जात आहेत?
२. बँका मजबूत झाल्या आहेत तर गरीब जनतेच्या बँक खात्यातून पैसे का कापले जात आहेत?
३. बँका मजबूत झाल्या आहेत तर वारंवार केवायसीच्या नावाखाली जनतेचे पैसे देण्यास नकार का दिला जात आहे?
४. बँकांमधून कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेऊन पळून गेलेल्या लोकांना पकडून देशात आणून शिक्षा का दिली जात नाही?
५. ग्रामीण भागात बँकांच्या शाखा आणि एटीएम बंद करून जनतेला रोख रकमेसाठी का भटकायला लावले जात आहे?
६. बँका मजबूत झाल्या आहेत तर मग शेतकरी, विद्यार्थी आणि छोट्या दुकानदारांना मध्यस्थ आणि हमीदाराशिवाय (Guarantor) कर्ज का मिळत नाही?
७. सायबर फसवणुकीला बळी पडलेल्या गरीब व्यक्तीचे पैसे लगेच परत का मिळत नाहीत? त्यांना पोलीस ठाणे आणि बँकांच्या चकरा का मारायला लावल्या जातात?
८. बँका मजबूत झाल्या आहेत तर मग गृहकर्ज आणि शैक्षणिक कर्जावरील व्याजदर इतका जास्त का आहे, ज्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे?
९. बँका मजबूत झाल्या आहेत तर डिजिटल ट्रान्झॅक्शन फेल झाल्यावर जनतेचा पैसा अनेक दिवस होल्डवर का ठेवला जातो?
१०. सिबिल स्कोरमधील छोट्याशा चुकीवर तरुणांना डिफॉल्टर ठरवून त्यांचे भविष्य का खराब केले जात आहे?
११. ज्येष्ठ नागरिक आणि अशिक्षित लोकांना यूपीआय आणि ऑनलाइन फसवणुकीपासून वाचवण्यासाठी प्रत्येक शाखेत सहायता काउंटर का नाही?
१२. बँका मजबूत झाल्या आहेत तर बँक कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्या का मान्य केल्या जात नाहीत? बँकांमध्ये नवीन भरती का होत नाही आणि सध्याच्या कर्मचाऱ्यांवर इतका दबाव का आहे की ज्यामुळे ग्राहक सेवाच कोलमडली आहे?

अखिलेश यादव यांनी या प्रश्नांच्या माध्यमातून सर्वसामान्य बँक खातेदार, कर्जदार, सायबर फसवणुकीचे बळी आणि बँक कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.