रशियाने युक्रेनचे १५ हून अधिक ऊर्जा सुविधा केंद्र केले उद्ध्वस्त, ३०० हून अधिक ड्रोन-क्षेपणास्त्रे डागली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रशियाने युक्रेनच्या ऊर्जा पायाभूत सुविधा केंद्रावर मोठे हल्ले केले आहेत. राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी शनिवारी माहिती दिली की, रशियाने देशाच्या विविध भागांमध्ये वीज निर्मिती आणि पुरवठा करणाऱ्या १५ हून अधिक महत्त्वाच्या सुविधा केंद्रांना लक्ष्य केले. या हल्ल्यांनंतर आता वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे.

राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या माहितीनुसार, लुत्स्क, रिव्ने, झायटोमिर, विन्नित्सिया, शेपेटिव्हका, स्लाव्हटा आणि नेटिशिन यांसारख्या शहरांमध्ये वीज व्यवस्थेवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. याशिवाय खार्किव, कीव आणि निप्रोपेत्रोव्स्क भागातही ऊर्जा संबंधित ठिकाणांचे मोठे नुकसान झाले आहे.

रात्रभरात ३२० हून अधिक ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली

शुक्रवार संध्याकाळी ७ ते शनिवार सकाळी ७ या वेळेत रशियाने ३२० हून अधिक ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली. यामध्ये शाहेद ड्रोनसोबत क्रूझ आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचाही समावेश होता. झेलेन्स्की म्हणाले की, कडाक्याच्या हिवाळ्यापूर्वी युक्रेनमधील वीज आणि हीटिंग पुरवठा ठप्प करण्याचा रशियाचा प्रयत्न आहे. त्यांनी मित्र राष्ट्रांना एअर डिफेन्स आणि इतर मदत देण्याचे आवाहन केले. तसेच वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी रात्रंदिवस काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांचेही त्यांनी आभार मानले.