हो, आम्ही रिजीम चेंज करायलाच उभे आहोत! – उद्धव ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

“प्रशांत भूषण जे बोलले, रिजीम चेंज. हो, आम्ही रिजीम चेंज करायलाच उभे आहोत, काय म्हणणं आहे तुमचं? जर तुम्ही आमच्याकडून निवडणुकीच्या माध्यमातून आमचं मत व्यक्त करण्याचा अधिकार काढून घेत असाल, आंदोलन करण्याचा अधिकार काढून घेत असाल, तर आम्ही ही सत्ता उलथवण्यासाठीच उभे आहोत”, असा हल्लाबोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिंष्ठान येथे पार पडलेल्या अखिल भारतीय पत्रकार परिषद आयोजित आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना ते असे म्हणाले आहेत.

आपल्या भाषणाची सुरुवात करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “अखिल भारतीय पत्रकार परिषदेला मी धन्यवाद देतो. तुम्ही पत्रकारितेची ही परंपरा ताजीतवानी ठेवली, यासाठी माझे तुम्हाला खास धन्यवाद. ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांचे अभिनंदन आहेच, पण ही परंपरा ताजीतवानी ठेवल्याबद्दल मी तुम्हाला विशेष धन्यवाद देतो. माझं बरंच काम हेमंत देसाई यांनी सोपं केलं आहे. त्यामुळे मला तटस्थ राहावं की काय, असं वाटायला लागलं आहे. एक गोष्ट खरी आहे की, तटस्थ असण्याचा खरा अर्थ काय, हा प्रशांत कदम तुम्ही जो मुद्दा मांडलात, तो महत्त्वाचा आहे. पत्रकाराने सुद्धा अंपायरसारखं राहिलं पाहिजे. आपण क्रिकेट, फुटबॉलची मॅच बघतो. न्यायाच्या बाबतीत काळं आणि पांढरं स्पष्ट पाहिजे. जसा फुटबॉलचा रेफ्री हा संपूर्ण वेळ खेळाडूंबरोबर धावत असतो, पण कोणी चूक केली तर, तो खेळाडू कोण आहे हे न बघता, तो त्याला यलो किंवा रेड कार्ड दाखवत असतो, हेच काम पत्रकारांचं आहे. कोणीही असेल, कितीही मोठा असेल, मेस्सी असो किंवा आणखी कोणी, पण ‘येथे तू मेस करून ठेवला आहेस, त्याबद्दल तुला रेड कार्ड’, असं सांगता आलं पाहिजे. यालाच तटस्थपणा म्हणतात.”

उद्धव ठाकरे म्हणाले की, “आता नेमकं पत्रकार म्हणायचं कोणाला? बाळशास्त्री जांभेकर, आचार्य अत्रे यांचं नाव घेतलं जातं, हे पत्रकार होते जे लिहीत होते. हेमंत देसाई आणि आपल्यापैकी अनेकजण आजही लिहितात. मात्र, आजचा जमाना असा आहे की आता लेखणी थोडी बाजूला पडली आहे. चॅनेल्स आणि यूट्यूबवर तुमच्यापैकी अनेकांना मी बघत असतो, मात्र तुमचं सुदैव की तुम्ही मला रोज बघत नाही. व्यंगचित्रकार हा सुद्धा एक पत्रकारच म्हटला पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना ‘भाष्यकार’ म्हणायला काहीच हरकत नाही. मला आठवतंय, काही वर्षांपूर्वी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पु. ल. देशपांडे यांची एका कार्यक्रमात भेट झाली होती. तेव्हा स्वतः बाळासाहेब पु. ल. देशपांडे यांना म्हणाले होते की, “मी रेषांचा व्यंगचित्रकार आणि तुम्ही शब्दांचे व्यंगचित्रकार आहात.” सोशल मीडियावर नवनवीन गोष्टी सुरू असतात, त्यातच आज एक कार्टून बघितलं. जशी रिजीम चेंजची बातमी आली आहे, तसंच मंगळवारी दसरा येतोय. रावण दहनाची गेले ६० वर्षे आमची परंपरा आहे. यावेळी दिल्लीत किंवा आणखी कुठे रावणासोबत ३० फुटी कॉक्रोच जाळणार आहेत. ज्यांनी रामाला आणलं, ते झुरळाला घाबरत आहेत. या कार्टूनमधील मार्मिकपणा काय असतो तो बघा; एक झुरळाचा पुतळा आहे आणि बाजूला रावण आहे. झुरळ त्याला विचारतोय, “अरे काय रे बाबा, तू सुद्धा नीट पेपरफुटी आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलन केलं होतं का?” म्हणजे कशाचा पुतळा कशासाठी जाळतायत, रावण काय, कॉक्रोच काय, काय चाललंय, कशाचा काही पत्ता नाही. मात्र आपलं रेटून न्यायचं. ही जी पत्रकारिता आहे, पत्रकारांची जी परंपरा आहे… मी १० वर्षांपूर्वी तुमच्या कार्यक्रमाला आलो होतो, याची आठवण आता तुम्ही करून दिली. आता १० वर्षांपूर्वी जे बोललो, तेच आज बोलतोय की नाही, मला माहीत नाही, कारण मी विषय विसरलो आहे. पण या पत्रकारितेला एक परंपरा आहे आणि परंपरेचा एक इतिहास आहे. आपल्या महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर, लढाऊ पत्रकारितेची गंगोत्री बाळशास्त्री जांभेकर आहेत. कारण त्यांनी ‘दर्पण’च्या पहिल्या अंकातच जे छापलं होतं, तो ६ जानेवारी १८३२ चा काळ होता. त्या पहिल्या अंकात त्यांनी छापलं होतं की, विलायतेतून ज्या विद्या येतात, त्याचं ज्ञान आपल्या लोकांना करून द्यायचं, त्याची माहिती समाजाला करून द्यायची, हे ‘दर्पण’चं काम होतं. नावही किती छान आहे, ‘दर्पण’! दर्पण म्हणजे आरसा. समाजाला आरसा दाखवणं, हेच तर पत्रकारांचं काम असतं. आता २०० वर्षे होतील, पण त्या वेळेला त्यांनी ‘दर्पण’ हे नाव किती समर्पकपणे ठेवलं होतं! महाराष्ट्रात ही गंगोत्री आहे. त्यानंतर मी जी परंपरा म्हणतोय, ती लोकहितवादींची; म्हणजे गोपाळ हरी देशमुख. त्यांची शतपत्रे. आता तुम्ही म्हणाल, या सगळ्या गोष्टी मला कशा माहीत? या बऱ्याचशा गोष्टी मी माझ्या आजोबांकडून ऐकल्या आहेत. म्हणून मला थोडंफार आठवतंय. आठवणीत कदाचित इकडे-तिकडे चूक होईल, कारण त्या मी बऱ्याच वर्षांपूर्वी ऐकल्या आहेत. भाऊ महाजन यांनी प्रभाकर काढलं होतं.”

ते म्हणाले की, “प्रभाकरमध्ये शतपत्रे छापली जायची. जे आज अपेक्षित आहे, ते या शतपत्रांमध्ये होतं की, कोणी कसाही असो, पण जिथे अमंगल दिसेल, अन्याय दिसेल, वाईट दिसेल, तिथे कोणीही असला तरी त्याचा मुलाहिजा न ठेवता त्याच्यावर प्रहार करणं. हे त्या लोकहितवादींनी केलं. म्हणजे आता जी काही सत्यशोधक वृत्ती आहे, त्याचे आद्यजनक म्हणायला त्यांना काही हरकत नाही; कारण त्याची सुरुवात त्यांनी केली. मग हळूहळू हा काळ पुढे सरकत आला. त्यानंतर मग आचार्य अत्रे आहेत, आपण टिळक-आगरकरांची नावे घेतो. हेमंत देसाई, तुम्ही जे बोललात ते फार महत्त्वाचं आहे, प्रशांत कदम तुम्ही पण बोललात. मतभेद असतील; पण मतभिन्नता आणि मतभेद याच्यात फरक आहे. मतभिन्नता म्हणजे मला हे पटतं, तुम्हाला नाही पटत. ठीक आहे ना. आचार्य अत्रे आणि बाळासाहेब यांच्यात सुद्धा वाद झाला होता, तो अगदी विकोपाला गेला, टोकाला गेला. पण आमच्या घरात कधीही अत्र्यांबद्दल अपशब्द उच्चारल्याचं मला तरी आठवत नाही. अत्रे थोर होतेच, अत्र्यांचा मोठेपणा कोणी नाकारत नाहीच. पण त्यांच्या काही गोष्टी आम्हाला, म्हणजे आजोबांना पटलेल्या नव्हत्या. तो काळ आणि तो वादाचा विषय सुद्धा वेगळा होता, हे मला माहीत आहे. पण अत्रे आणि ठाकरे वाद झाला. तसेच शरद पवार आणि बाळासाहेब यांची मैत्री जेवढी घनिष्ठ होती, तेवढेच त्यांचे मतभेद पण टोकाचे होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, “मला आजही आठवतं, बाळासाहेब नेहमी सांगायचे किंवा अनेकांना बोलले असतील की, शरद पवार जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांचं अभिनंदन करायला बाळासाहेब वर्षा बंगल्यावर गेले होते. त्यावेळी शरद पवार तिथे नव्हते, ते बाहेर गेले होते. तिथे प्रतिभाताई होत्या. त्या म्हणाल्या, “या बाळासाहेब, बसा.” त्यावर बाळासाहेब म्हणाले, “नाही, मी फक्त शुभेच्छा द्यायला आलो आहे.” त्यांनी पुष्पगुच्छ दिला आणि सांगितलं, बाळासाहेब त्यांना शरदबाबू म्हणायचे, शरदबाबूंना सांगा की, माझा मित्र मुख्यमंत्री झाला, याचा मला आनंद आहे. पण तो ज्या पद्धतीने झाला, ते मला आवडलेलं नाही. हे असं रोखठोक होतं. हे पटलं, ते पटलं नाही. जॉर्ज फर्नांडिस आणि बाळासाहेब यांचं नातं सुद्धा किती वेगळं होतं, हे हल्ली सगळे विसरून गेलेत. जॉर्ज फर्नांडिस आणि बाळासाहेब हे सुद्धा घनिष्ठ मित्र होते. पण व्यासपीठावर उभे राहिले की, त्यांच्यात एकदम टोकाचे मतभेद असायचे. पण एवढं झाल्यानंतर ज्या ज्या वेळेला दोघांची भेट व्हायची, तेव्हा दोघे एकमेकांशी ज्या आपुलकीने बोलायचे, ते मी स्वतः बघितलं आहे. आता हे सगळं दुर्मिळ होत चाललं आहे, किंबहुना गेलंच आहे.”

ते पुढे म्हणाले की, “मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगत होतो, त्या मी स्वतः बघितलेल्या आहेत. पण टिळक काय किंवा आगरकर काय, माझ्या आजोबांनी मला सांगितलेली एक गोष्ट आहे की, आगरकर सुद्धा याच पठडीतले होते. हे सगळे समाजसुधारक, विचारवंत! त्यांची जिवंतपणी प्रेतयात्रा काढली गेली. हे तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल. पुण्यामध्ये प्रेतयात्रा काढली आणि त्यांना बोलावलं, “अहो गोपाळराव, खाली या!” गोपाळराव खाली गेले. त्यांना सांगितलं, “बघा, हे तुमचं प्रेत आहे.” ते बघितल्यानंतर दुसरा कोणी असता, तर त्याला देशद्रोही ठरवून टाकलं असतं. एक तर तिथपर्यंत येऊच दिलं नसतं, त्याला त्याच बांबूंनी मारलं असतं. पण आगरकरांनी ते बघितलं आणि ते म्हणाले, “वा! वा! आज मला खूप समाधान वाटलं.” लोक म्हणाले, “ते कसं? तुम्हाला हे बघून काही वाटत नाही?” ते म्हणाले, “मला समाधान झालं, कारण माझ्यासारख्या बाडग्या सुधारकाच्या प्रेतयात्रेला कदाचित तेव्हाचे शब्द होते, महार मांग वगैरे, हे उचलून घेऊन जातील की काय, फक्त अशी मला भीती होती. पण निदान एवढे लोक तरी जमलेत, केवढं मोठं भाग्य माझं!” तर यातला जो मार्मिकपणा आहे ना की, समोरच्याला खजील कसं करायचं, हे हल्ली आपण सगळे विसरून गेलो आहोत.”

पत्रकारांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “सध्या मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांची युती आहे. कारण जरा काही बोललो की, तुम्ही काय आणि आम्ही काय, सगळेच देशद्रोही ठरतो. आता मला वाटतं प्रशांत भूषण जे बोलले, रिजीम चेंज. हो, आम्ही रिजीम चेंज करायलाच उभे आहोत, काय म्हणणं आहे तुमचं? जर तुम्ही आमच्याकडून निवडणुकीच्या माध्यमातून आमचं मत व्यक्त करण्याचा अधिकार काढून घेत असाल, आंदोलन करण्याचा अधिकार काढून घेत असाल, तर आम्ही ही सत्ता उलथवण्यासाठीच उभे आहोत, दुसरं काय बोलायचं सांगा! बरं, जर ते असा प्रश्न विचारणार असतील की, ‘यांना रिजीम चेंज करायचं आहे’, तर मग मला अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींना, राजनाथ सिंहांना आणि सगळ्यांनाच एक प्रश्न विचारायचा आहे की, तुम्ही जे हजारो पोलीस दिल्लीत आणून ठेवले आहेत, ते काय नवरात्रीत दांडिया खेळायला आणून ठेवलेत? ते मुलांची डोकी फोडतायत. महिलांना आणि मुलींना वेडंवाकडं वाटेल तसं मारत आहेत. फरफटत नेतायत, त्यांचे केस ओढतायत. हे काय तुमचं चाललंय? अशी राजवट ही गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही हे सगळे उभे आहोत.”