
राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी निघालेल्या कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांना दिल्ली पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली. त्यानंतर त्यांना आज विशेष कार्यकारी दंडाधिकाऱयांनी जामीन मंजूर केला. जामीन मंजूर करण्यासाठी दीपके यांच्याकडून शांतता कराराच्या बॉण्डवर स्वाक्षरी घेण्यात आली.
शुक्रवारी पोलिसांचे निर्देश झुगारत दीपके हे तिरंगा फडकवण्यासाठी घराबाहेर पडताच त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरा त्यांना पोलिसांनी अटक केली. आज सकाळी दीपके यांना विशेष कार्यकारी दंडाधिकाऱयांसमोर हजर करण्यात आले. शांतताभंग आणि दखलपात्र गुह्यांसदर्भात दीपपेंवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. आज त्यांना जामीन मंजूर करण्यापूर्वी बॉण्डवर सही करावी लागली. एक वर्ष शांततेच्या नियमांचे पालन करावे लागेल, अशी अट त्यात घालण्यात आली आहे.
नेहा बोरा यांचीही सुटका
‘लहरा दो तिरंगा’ मार्चपूर्वी ‘आयसा’ विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष नेहा बोरा यांनाही ताब्यात घेण्यात आले होते. दिल्ली पोलिसांनी त्यांना सुमारे 5 तास विविध ठिकाणी नेल्याचा आरोप आयसाने केला आहे. नेहा बोरा यांची शनिवारी पहाटे सुटका करण्यात आली. दिल्ली पोलिसांनी नेहा बोरा यांच्यावरही बॉण्डवर स्वाक्षरी करण्यासाठी दबाव टाकला होता. मात्र, त्यांनी कोणत्याही बॉण्डवर स्वाक्षरी करणार नाही, असे स्पष्ट केले.



























































