अमृताची सुवर्णसंधी हुकली; कोमलला कांस्य, जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जागतिक कुस्तीच्या आखाडय़ात महाराष्ट्राच्या अमृता पुजारीने अंतिम फेरीपर्यंत धडक मारत रौप्यपदकावर नाव कोरले, तर कोमलने कांस्यपदकाची कमाई केली. मात्र, सुवर्णपदकाच्या निर्णायक लढतीत अमृताला युक्रेनच्या इरिना झब्लोत्स्काकडून पराभव स्वीकारावा लागला. 23 वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत हिंदुस्थानी महिला मल्लांनी दोन पदके जिंकली; पण आणखी पदकांची अपेक्षा असताना काही लढतींत हिंदुस्थानी मल्लांना अपयश आले.

महिलांच्या 72 किलो वजनी गटाच्या अंतिम लढतीत अमृताचा सामना युव्रेनच्या इरिना झब्लोत्स्काशी झाला. झब्लोत्स्काने 6-0 अशी आघाडी घेतल्यानंतर अमृताला पकडीत घेत निर्णायक चीतपट केले. त्यामुळे दोन वेळा महिला ‘महाराष्ट्र केसरी’चा किताब पटकावलेल्या अमृताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीपर्यंत मजल मारणाऱया अमृताच्या कामगिरीने महाराष्ट्राच्या कुस्तीविश्वाला अभिमानाची संधी दिली.

कोमलने कांस्यपदक जिंकले

महिलांच्या 59 किलो गटात कोमलने यापूर्वीच कांस्यपदक जिंकून हिंदुस्थानच्या खात्यात भर घातली होती. अमृताच्या रौप्यपदकासह हिंदुस्थानी महिलांनी स्पर्धेतील आपली मोहीम दोन पदकांसह पूर्ण केली.