
राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या वाढत्या अडचणी लक्षात घेऊन शिवसेनेने चंद्रपूर शहरातील या वर्षीचा जय भवानी दांडिया महोत्सव रद्द करत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी करत चंद्रपूर जिल्ह्यातील चार आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत देण्यात आली. सण-उत्सवावरील खर्च टाळून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत करण्याच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
चंद्रपूर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त जय भवानी दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा शेतकऱ्यांवर ओढवलेले आर्थिक संकट लक्षात घेता दांडिया महोत्सवाच्या आयोजनासाठी खर्च होणारी रक्कम आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबे आणि गरजू शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरण्यात येईल, अशी घोषणा शिवसेनेचे चंद्रपूर जिल्हाप्रमुख संदीप गिऱहे यांनी केली होती. त्याप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यातील मारडा आणि वेळवा या दोन गावांतील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. जिल्हाप्रमुख संदीप गिऱहे यांच्यासह पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संबंधित कुटुंबांच्या घरी जाऊन मदतीची रक्कम सुपूर्द केली. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सतीश भिवगडे, उपमहापौर दानव, गटनेते राहुल विरूटकर, नगरसेवक आकाश साखरकर, नगरसेविका श्रुती घटे, नगरसेविका श्वेता लांडगे, नगरसेवक आशीष कवटकर, सोनू ठाकूर आणि राहुल बेले आदी उपस्थित होते.


























































