Chandrapur news – महाकालीच्या दर्शनासाठी निघालेल्या 9 वर्षीय चिमुरड्यावर बिबट्याची झडप, कुटुंबीयांसमोरून ओढत नेलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपुरात माता महाकालीच्या दर्शनासाठी कुटुंबासोबत पायी जात असलेल्या 9 वर्षीय चिमुरड्यावर बिबट्याने झडप घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बल्लारपूर–चंद्रपूर महामार्गावरील विसापूर येथील चुनाभट्टीजवळील वळण रस्त्यावर शनिवारी रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

कार्तिक जाधव (वय – 9) असे चिमुरड्याचे नाव असून तो हैदराबाद येथील रहिवासी आहे. तो आत्याच्या घरी बल्लारपूर येथे आला होता. कुटुंबासोबत माता महाकालीच्या दर्शनासाठी पायी जात असताना अचानक बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. बिबट्याने जबड्यात पकडून त्याला बॉटनिकल गार्डनच्या भिंतीवरून आत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने त्याला तिथेच सोडून पळ काढला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि बल्लारपूर पोलिसांनी संयुक्त शोधमोहीम राबवली. रात्री साडेअकराच्या सुमारास कार्तिक भिंतीजवळ जखमी अवस्थेत आढळून आला. त्याच्या मानेवर जखमा झाल्याने त्याला तातडीने चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.