
कोलकाता येथे शनिवारी संध्याकाळी दुर्गा पूजा मंडपात झालेली चेंगराचेंगरी आणि 19 जणांच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी आयोजकांसह सात जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये चोरबागन दुर्गा पूजा समितीचे सचिव राज कुमार सेवडा आणि उपाध्यक्ष शांतनु दुबे यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, बांबूच्या संरचनेचे बांधकाम करणारे बिप्लब मुखर्जी, गर्दीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेले कौशिक साहा आणि पिंटू डे, तसेच खासगी सुरक्षा व्यवस्थेचे प्रमुख सुमन चक्रवर्ती आणि राजेश पाल यांनाही अटक करण्यात आली आहे.
याव्यतिरिक्त, 14 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी अधिक चौकशी सुरू आहे. याप्रकरणी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे, असे एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
चोरबागन दुर्गा मंडपात शनिवारी सायंकाळी 7.40 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. शनिवारी ‘सप्तमी’ला येथे भाविकांची मोठी गर्दी जमली होती. यावेळी दुर्गा पूजेच्या आयोजकांनी केलेल्या घोषणेमुळे भाविकांची धावपळ झाली आणि ही दुर्दैवी घटना घडली, अशी माहिती मिळते. दरम्यान लाउडस्पीकरवरून नेमकी काय घोषणा करण्यात आली होती, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
























































