ना. म. जोशी मार्ग बीडीडीवासीयांचा दसऱ्याचा मुहूर्त हुकणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पामधील 557 रहिवाशांना नवरात्रीमध्ये नव्या घरांच्या चाव्यांचे वाटप करण्याचे म्हाडाचे नियोजन होते. चावीवाटप कार्यक्रमासाठी म्हाडाने नवरात्रीच्या आधीच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून वेळ मागितली होती. मात्र अद्याप मुख्यमंत्र्यांची वेळ मिळाली नसल्याने दसऱ्याला नवीन घरात गृहप्रवेश करण्याचे येथील रहिवाशांचे स्वप्न अपूर्ण राहणार आहे.

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प राज्य शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग या बीडीडी चाळींचा पुनर्विकास केला जात आहे. महाविकास आघाडीच्या काळात या प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे वेळोवेळी या प्रकल्पांना भेट देऊन कामाच्या प्रगतीचा आढावा घेतात. ना. म. जोशी मार्ग येथील 32 चाळींमधील 2560 रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी 23 मजल्यांचे 14 टॉवर उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. पहिल्या टप्प्यात पुनर्वसन इमारत क्र. 1 मधील ‘ई’, ‘एफ’, ‘जी’ विंगमधील 557 घरांचे वितरण केले जाणार आहे.