राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी कारवाईची मागणी, रामभक्तांनी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र; आपचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आम आदमी पक्षाचे पंजाबचे प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री अमन अरोरा यांनी अयोध्या येथील राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणात जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावरून सत्तेत आलेल्या भाजपने भक्तांच्या श्रद्धेशी खेळणाऱ्या कोणालाही पाठीशी घालू नये, असे त्यांनी म्हटले आहे.

अमन अरोरा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, अयोध्येत श्रीराम मंदिर उभारणीसाठी लाखो राम भक्तांनी आपल्या कष्टाची कमाई अतिशय श्रद्धेने दान केली होती. मात्र जर या देणगीत कोणताही घोटाळा झाला असेल, तर तो भक्तांच्या विश्वासाला दिलेला मोठा धोका आहे. त्यांनी देणगी चोरीच्या १०५ घटनांचा संदर्भ देत या संपूर्ण प्रकरणात केवळ कनिष्ठ कर्मचाऱ्यांवरच नव्हे, तर वरिष्ठ अधिकारी आणि मंदिर व्यवस्थापनातील जबाबदार व्यक्तींच्या भूमिकेचीही सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली. वारंवार चोरीच्या घटना घडत असतील तर संस्था चालवणाऱ्यांचीही जबाबदारी निश्चित व्हायला हवी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

हे प्रकरण आपण केवळ पक्षाचा अध्यक्ष म्हणून नव्हे, तर एक रामभक्त म्हणून उचलून धरत असल्याचे अरोरा यांनी म्हटले आहे. देशभरातील लोकांनी राम मंदिर उभारणीचे मोठ्या आनंदाने स्वागत करत आपल्या बचतीतून सढळ हाताने मदत केली आहे, त्यामुळे त्यांच्या भावनांचा सन्मान राखला गेलाच पाहिजे, असेही ते म्हणाले.

याच पार्श्वभूमीवर पंजाबमधील एक लाखांहून अधिक राम भक्तांनी पंतप्रधान मोदींना स्वतःहून पत्रे लिहिली आहेत. या पत्रांमध्ये पंतप्रधानांनी या विषयात लक्ष घालून न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्यातील सुमारे २२,००० मतदान केंद्रांमधून जमा झालेली ही पत्रे आता पंतप्रधान मोदींना सोपवली जाणार असल्याची माहिती अरोरा यांनी दिली.