सामना अग्रलेख – हा दसरा खास आहे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा’ असे फक्त म्हणायचे. मोदी–शहांच्या राजवटीत आनंदाचा दुष्काळच पडला आहे. दसऱ्याचा आनंद पुन्हा मिळवायचा असेल तर ‘रेजिम चेंज’ म्हणजे सत्ताबदल घडवायचाच, सत्तेतील रावणांचा पराभव करायचाच, या जिद्दीने पेटून उठायला हवे. दसऱ्याच्या निमित्ताने शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा लोकांच्या भावनांचा स्फोट घडवून विचारांचे सोने लुटेल आणि विचारांचा तिरंगा फडकवत ठेवेल. पांडवांप्रमाणे शमीच्या झाडावरील शस्त्रे काढून लोकयुद्धाचा एल्गार पुकारण्याचा आजचा दिवस आहे. हा दसरा खास आहे.

विजया दशमी म्हणजे दसऱयाचे महत्त्व आपल्या संस्कृतीत मोलाचे आहे. वाईटावर चांगल्याचा आणि अधर्मावर धर्माचा विजय झाल्याचे प्रतीक म्हणून हिंदू समाज ‘दसरा’ साजरा करतो. त्यामागे खूप कथा आहेत. भगवान श्रीराम यांनी रावणाचा वध करून सीता मातेला मुक्त केले, सत्याचा विजय झाला म्हणून रावणदहन करून दसरा साजरा केला जातो. देवी दुर्गेने नऊ दिवस युद्ध करून दशमीच्या दिवशी महिषासुराचा वध केला होता. त्यासाठी स्त्री शक्तीची पूजा म्हणून दसरा साजरा केला जातो. महाभारतानुसार अज्ञातवासाला जाण्यापूर्वी पांडवांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर लपवून ठेवली होती. विजया दशमीच्या दिवशी त्यांनी ती शस्त्रे धारण करून कौरवांवर विजय मिळवला होता. म्हणून या दिवशी शस्त्रपूजा करून दसरा साजरा केला जातो. दसऱ्याचा आनंद उत्सव म्हणजे पावसाळय़ात पेरलेले पहिले पीक शेतातून घरी येते व शेतकरी हा आनंद ‘दसरा’ म्हणून साजरा करतात. अशी ही दसरा साजरा करण्याची विविध कारणे आहेत, पण या तीनही कथांनुसार आनंद साजरा करावा, अशी स्थिती आज काही आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतात नाही. पांडवांनी कौरवांचा नाश करण्यासाठी शस्त्रपूजा केली, पण महाराष्ट्रात कौरवांच्याच हाती शस्त्रे आहेत व ते सार्वजनिक ठिकाणी गोळीबार करून हत्या घडवत आहेत. दसऱ्याच्या पूर्वसंध्येस टायगर श्रॉफ या

प्रख्यात अभिनेत्यावर

अंदाधुंद गोळय़ा झाडल्या गेल्या. ठाण्यात प्रदीप पूर्णेकर या शिवसेना पदाधिकाऱ्यावर गोळय़ा झाडून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. पुन्हा पुर्णेकरांच्या हल्लेखोरांना राजकीय वरदहस्त लाभला आहे. त्यामुळे इथे अधर्मावर धर्माचा विजय होताना दिसत नाही. धर्माला ग्लानी आलीच आहे व देवाने अवतार घेण्याऐवजी गुंड व झुंड अवतार घेऊन दहशत पसरवत आहेत. अशा वेळी दसऱ्याचा ‘आनंद’ साजरा करायचा कसा? श्रीरामांनी रावणाचा वध करून सीतेला मुक्त केले हे दसऱ्याचे शुभचिंतन म्हणावे, तर आज अनेक माता-भगिनी गुंडांच्या अत्याचाराच्या शिकार झाल्या आहेत. दिल्लीच्या आंदोलनात महिलांचा विनयभंग पोलिसांनीच केला. त्यांना निर्घृणपणे मारले. मुंबईतही तेच घडले. अयोध्येत राम-सीतेच्या राज्यात चोऱ्या आणि लुटालुटीचा कहर झाला. राम-सीतेचे अलंकार, पैसा खुद्द भाजपच्या रखवालदारांनी चोरला. त्यामुळे श्रीरामाचे पावित्र्य ते काय राहिले? देवी दुर्गेने महिषासुराचे मर्दन केले, पण आज सर्वत्र महिषासुरच माजले आहेत व तेच राज्य करीत आहेत. ही आजच्या दसऱ्याची स्थिती आहे. लोकांच्या जीवनातला आनंद साफ हरवला आहे. ‘रामराज्य’ संपवून जणू ‘रावणराज्य’ सुरू आहे. त्यामुळे कोणत्या विचारांचे सोने लुटायचे आणि सीमोल्लंघन करायचे? हा प्रश्नच आहे. लोकांची मने अशांत आहेत आणि देश खदखदताना दिसत आहे. राज्यकर्त्यांच्या

अन्यायाविरुद्ध जनता

रस्त्यावर उतरून बंड करत आहे. निवडणुका लुटल्या जात आहेत. महागाई, बेरोजगारीने कहर केला आहे. शेतकरी दुष्काळाच्या वणव्यात होरपळला आहे. खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, गुरांना चारा नाही. कर्जाच्या ओझ्यामुळे घरादारांवर बँकांची जप्ती सुरू आहे व मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाच हजारांची उचल देऊन ‘‘आनंद साजरा करा’’ अशी बळीराजाची चेष्टाच केली आहे. ‘दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा’ असे फक्त म्हणायचे. मोदी-शहांच्या राजवटीत आनंदाचा दुष्काळच पडला आहे. म्हणूनच देश पेटून उठलाय. जगातील अनेक राष्ट्रे, खास करून युरोपातील फ्रान्स, इटली, बेल्जियम, जर्मनी, पोर्तुगाल, ग्रीसमध्ये जनता महागाईविरोधात बंड करून उठली आहे. सत्ता उलथवून टाकण्याच्या निर्धाराने जनता रस्त्यावर उतरली आहे. जाळपोळ करीत आहे. भारतातील चित्र यापेक्षा वेगळे नाही. केंद्रातील सरकार तिरंगा फडकवायला बंदी घालीत आहे, यापेक्षा भयंकर कृत्य कोणते? दसऱ्याचा आनंद पुन्हा मिळवायचा असेल तर ‘रेजिम चेंज’ म्हणजे सत्ताबदल घडवायचाच, सत्तेतील रावणांचा पराभव करायचाच, या जिद्दीने पेटून उठायला हवे. दसऱ्याच्या निमित्ताने शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा लोकांच्या भावनांचा स्फोट घडवून विचारांचे सोने लुटेल आणि विचारांचा तिरंगा फडकवत ठेवेल. पांडवांप्रमाणे शमीच्या झाडावरील शस्त्रे काढून लोकयुद्धाचा एल्गार पुकारण्याचा आजचा दिवस आहे. हा दसरा खास आहे.