इटलीत महागाई विरोधातील आंदोलनाला हिंसक वळण; हिंदुस्थानींसाठी अ‍ॅडव्हायजरी जारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इटलीमध्ये वाढती महागाई, दैनंदिन गरजांच्या वस्तूंचे वाढते दर आणि सार्वजनिक सेवांच्या स्थितीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. मिलानसह अनेक शहरांमध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला. काही ठिकाणी दुकानांची लूटमार आणि सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करण्यात आली. या पार्श्वभूमीवर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सोमवारी सार्वजनिक सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावली. दरम्यान, इटलीतील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी भारतीय दूतावासाने विशेष सूचना जारी केल्या आहेत.

मिलानमध्ये रविवारी झालेल्या हिंसक आंदोलनादरम्यान पोलिसांनी २७१ तरुणांना ताब्यात घेतले. त्यापैकी ३२ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये २३ अल्पवयीन आणि १३ परदेशी नागरिकांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. याशिवाय, २८ जणांविरोधात न्यायालयीन अधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवण्यात आले आहेत.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार मिलानच्या मध्यवर्ती भागात शेकडो मुखवटाधारी आंदोलकांनी कचराकुंड्यांना आग लावली, तसेच काही दुकानांमध्ये लूटमार केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर केला.

इटलीतील परिस्थिती लक्षात घेऊन हिंदुस्थानी मिशनने तेथे राहणाऱ्या आणि प्रवासासाठी गेलेल्या हिंदुस्थानी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. गर्दीची ठिकाणे आणि आंदोलन सुरू असलेल्या परिसरापासून दूर राहावे, तसेच स्थानिक बातम्यांवर लक्ष ठेवावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

आपत्कालीन परिस्थितीत भारतीय नागरिकांना खालील क्रमांकांवर संपर्क साधता येईल.

हिंदुस्थानी दूतावास, रोम: +39 331 614 2085

हिंदुस्थानचे महावाणिज्य दूतावास, मिलान: +39 3881647527

इटलीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी आंदोलनादरम्यान हिंसाचाराच्या घटना घडल्या. यापूर्वी शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी मिलान, बोलोन्या, ब्रेसिया, बर्गामो आणि ट्यूरिनसह उत्तर इटलीतील अनेक शहरांमध्ये निदर्शने करण्यात आली होती. शनिवारी झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणात २८ आंदोलकांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. वाढती महागाई, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आणि सार्वजनिक सेवांबाबत नागरिकांमध्ये असलेली नाराजी ही या आंदोलनामागील प्रमुख कारणे असल्याचे सांगितले जात आहे.

इटलीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शेजारील फ्रान्समध्येही वाढती महागाई आणि सार्वजनिक सेवांच्या घसरत्या दर्जाविरोधात मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाल्याचे वृत्त आहे. शनिवारी अनेक नागरिक रस्त्यावर उतरले होते. काही ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्षही झाला.