
आधुनिक भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक इतिहासात ‘स्वाध्याय’ परिवाराचे आद्य प्रवर्तक पांडुरंगशास्त्री आठवले अर्थात दादाजी यांचे नाव अभिनव समाजक्रांतीचे प्रणेते म्हणून घ्यावे लागेल. समाज परिवर्तनासाठी राजकीय सत्ता, आर्थिक बळ किंवा संघर्षाची आवश्यकता असते, असे मानले जाते, परंतु माणसाच्या अंतःकरणात ईश्वरनिष्ठा जागवून, त्यातून आत्मसन्मान, परस्परप्रेम आणि सामाजिक उत्तरदायित्व निर्माण करता येते, हे दादाजींनी स्वाध्याय परिवाराच्या माध्यमातून सिद्ध केले. भक्ती ही केवळ वैयक्तिक उपासना नसून ती समाजाच्या उन्नतीची प्रभावी शक्ती आहे, हा त्यांच्या कार्याचा मूलाधार होता.
आजचे युग म्हणजे वेग, धावपळ आणि स्पर्धेचा अखंड प्रवास. सकाळी डोळे उघडल्यापासून मोबाईल, नोकरी, उद्योग, व्यवसाय, कौटुंबिक जबाबदाऱया आणि आर्थिक विवंचना यांमध्ये माणूस गुरफटून जातो. रात्री शरीर थकलेले असते, मन दमलेले आणि विचारांची दिशाही हरवलेली असते. अशा परिस्थितीत स्वतःशी, परमेश्वराशी आणि आपल्या अंतःकरणाशी संवाद साधण्यासाठी वेळच उरत नाही. या आधुनिक जीवनशैलीवर उपाय म्हणून स्वाध्याय परिवाराने दिलेली त्रिकाल संध्येसारखी साधना माणसाला आत्मचिंतनाची, आत्मपरीक्षणाची आणि जीवनातील दैवी तत्त्वाची जाणीव करून देते.
दादाजींच्या या कार्याची पायाभरणी त्यांच्या वडिलांनी, वैजनाथशास्त्री आठवले यांनी या वर्षी शताब्दी पूर्ण करणाऱ्या म्हणजे 1926 मध्ये स्थापन केलेल्या श्रीमद्भगवद्गीता पाठशाळेत झाली. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत आणि भारतीय तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास तसेच मुंबईच्या रॉयल एशियाटिक लायब्ररीत बसून विविध जागतिक विचारधारांचे केलेलं चिंतन यांमुळे पांडुरंगशास्त्रीच्या विचारांना व्यापकता प्राप्त झाली. भगवद्गीतेतील योगेश्वर श्रीकृष्णाचा संदेश त्यांनी सर्वसामान्यांच्या जगण्याशी जोडला. त्यांच्या प्रवचनांतून धर्मग्रंथांचे केवळ विवेचन होत नसे, तर माणसाने कसे जगावे, कर्तव्य कसे पार पाडावे, श्रमाला प्रतिष्ठा कशी द्यावी आणि समाजातील भेदभाव कसे दूर करावेत, स्वतःचा जीवन विकास कसा करावा, याचे मार्गदर्शन मिळत असे. अशा रीतीने त्यांनी ग्रंथज्ञानाचे कृतीज्ञानात रूपांतर केले.
या विचारांचा प्रत्यक्ष आविष्कार म्हणजे स्वाध्याय परिवाराचे विविध प्रयोग. भक्तीफेरी, मत्स्यगंधा, घरमंदिर आणि अमृतालयम् यांसारख्या संकल्पनांनी सामूहिक भक्ती आणि सामाजिक एकात्मतेला बळ दिले. योगेश्वर कृषीने शेतीला भक्तीचे अधिष्ठान दिले, तर वृक्षमंदिराने वृक्षांमध्ये परमेश्वराचे दर्शन घडवून पर्यावरण संवर्धनाला आध्यात्मिक अर्थ दिला.
जगाच्या इतिहासात मानवतेला दिशा देणाऱ्या अनेक महान व्यक्ती होऊन गेल्या. प्लेटोने आदर्श समाजाची संकल्पना मांडली, गौतम बुद्धांनी करुणा आणि अहिंसेचा संदेश दिला, तर कार्ल मार्क्सने आर्थिक विषमता आणि वर्गसंघर्षाच्या प्रश्नांकडे जगाचे लक्ष वेधले. महात्मा गांधींनी सत्याग्रह आणि अहिंसेच्या बळावर स्वातंत्र्यलढय़ाला नैतिक अधिष्ठान दिले, तर नेल्सन मंडेला यांनी वर्णभेदाविरुद्धच्या लढय़ातून समानता आणि लोकशाहीसाठी आपले आयुष्य समर्पित केले. या सर्वांचे कार्य मानवतेच्या इतिहासातील महत्त्वाचे पर्व आहे. देश-विदेशातील अनेक महापुरुषांच्या कार्याप्रमाणेच पांडुरंगशास्त्र्ााRच्या कार्याच्या केंद्रस्थानीही मानवकल्याण होते, मात्र त्यांची कार्यपद्धती वैशिष्टय़पूर्ण होती. त्यांनी समाजपरिवर्तनाचा पाया माणसाच्या अंतःकरणातील ईश्वरनिष्ठा, आत्मीयता आणि स्वयंस्फूर्त कर्तव्यभावनेत शोधला. संघटनात्मक चौकटीपेक्षा व्यक्तीच्या अंतर्गत परिवर्तनाला त्यांनी अधिक महत्त्व दिले.
श्रीमद्भगवद्गीता पाठशाळेच्या शतकपूर्तीच्या निमित्ताने हा संपूर्ण प्रवास स्मरणात घेताना त्यांच्या विचारांत अध्यात्म हे जगापासून पलायन नसून जगण्याला अधिक अर्थपूर्ण, सुसंवादी आणि मानवतावादी बनविण्याचे साधन आहे. व्यक्तीच्या अंतःकरणातील परिवर्तनातून कुटुंब, समाज आणि अखेर संपूर्ण मानवजातीच्या जीवनात परिवर्तन घडू शकते, हा त्यांच्या कार्याचा मूलभूत संदेश आहे.
जगभरातील युद्धे, धार्मिक संघर्ष, देशदेशातील सुरू असलेलं व्यापार युद्ध, आर्थिक विषमता, पर्यावरणीय संकटे आणि मानसिक तणाव यांनी ग्रस्त असलेल्या जगाला दादाजींचा संदेश अत्यंत आवश्यक आहे, सर्व धर्मांचा आदर करा, आत्मीयतेने जगा आणि मानवतेच्या क्रांतीकडे वाटचाल करा. माणसाचे डोके फोडून नव्हे, तर त्याच्या डोक्यातील विचार बदलून खरी क्रांती घडते, हा दादाजींच्या कार्याचा संदेश आहे.
काळ बदलला, जीवनशैली बदलली, आव्हाने बदलली, परंतु माणसाला माणसाशी जोडणाऱया प्रेमाची आणि आत्मीयतेची गरज आजही कायम आहे. ‘स्वाध्याय’ परिवाराचा हा विचार केवळ एका परिवाराचा वारसा नसून संपूर्ण मानवजातीला प्रेम, समता, सहजीवन आणि विश्वबंधुत्वाचा मार्ग दाखवणारा आहे. भक्तीतून व्यक्तीची उन्नती, व्यक्तीतून समाजाची उन्नती आणि समाजातून विश्वमानवतेची उन्नती, हा स्वाध्यायाचा वैचारिक महामार्ग आहे.
अनिल दत्तात्रेय साखरे






























































