
केवळ तीन महिन्यांत गुंतवणूक केलेल्या रकमेच्या दीडपट रक्कम आणि आलिशान गाडी देण्याचे आमिष दाखवून 3 कोटी 28 लाख 50 हजार रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी विटा पोलिसांत पुण्यातील तीनजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऋषिकेश अशोक बारटक्के (रा. बाणेर, मायोला रेसिडेन्सी, पुणे), नितीन सुभाष शहा (रा. सदाशिव पेठ, पुणे), आदित्य दाडे (रा. मुकुंदनगर, स्वारगेट, पुणे) व नीलमणी धैर्यशील देसाई (रा. बाणेर रोड, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. आबाजीराव दत्ताजीराव देशमुख (रा. माहुली, ता. विटा) यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली आहे.
आबाजीराव देशमुख हे 2015 मध्ये डॉ. सुशांक शहा बॅरिऍट्रिक रिसर्च सेंटरमध्ये शस्त्र्ाक्रियेसाठी दाखल झाले होते. तेव्हा डॉ. सुशांक शहा यांचे भाऊ नितीन शहा यांच्याशी देशमुख यांची ओळख झाली होती. ऑपरेशननंतर 2 वर्षे फॉलोअपसाठी जावे लागत असल्याने शहा आणि देशमुख यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले होते. नितीन शहा यांचे मित्र ऋषिकेश बारटक्के हे देशमुख यांच्याकडे सातत्याने माहुली येथे येत होते.
ऋषिकेश बारटक्के हा पुणे येथे कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करत असून, त्यांनी नीलमणी देसाई यांच्या मालकीची पर्वती येथील 49 गुंठे जागा कुलमुखत्यारपत्राद्वारे सर्व शासकीय कार्यवाही पूर्ण करून विक्री करण्यासाठी घेतलेली असल्याचे सांगितले. या जागेमध्ये असलेल्या महसूलच्या अडचणी दूर करण्यासाठी व इतर कामे करण्यासाठी 4 कोटी रुपयांची आवश्यकता असून, या जागेमध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यास रकमेवर 3 महिन्यांमध्ये दीडपट मोबदला देतो तसेच नवीन चारचाकी आलिशान वाहन देतो, असे आमिष बारटक्के याने देशमुख यांना दाखविले. त्यानंतर देशमुख यांनी वेगवेगळ्या माध्यमांतून 3 कोटी 28 लाख 50 हजार रुपये ऋषिकेश बारटक्के व नितीन शहा यांना दिले.
त्यावेळी बारटक्के याने त्याची फोर्ड इंडिव्हेअर गाडी व्यवहारापोटी आमिष दाखवून फसवणूक करण्याच्या उद्देशाने दिली; परंतु या गाडीबाबत माहिती घेतली असता, ऋषिकेश बारटक्के याने ही गाडी खरेदी केल्यापासून बँकेचे हप्तेच भरलेले नसल्याचे देशमुख यांना समजले. त्यानंतर देशमुख यांच्यासह इतर गुंतवणूकदारांनी बारटक्के व शहा यांच्याकडे पैशांबाबत पाठपुरावा केला. त्यावेळी 18 फेब्रुवारी 2020 रोजी करारनामा करून 4 महिन्यांत पैसे देण्याचे मान्य केले. मात्र, आजवर पैसे दिले नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.






























































