न्यायाधीशांनी न्यायालयाची प्रतिष्ठा राखायला हवी, मद्यपी न्यायाधीशाला काढले कामावरून

न्यायाधीश व न्यायिक अधिकाऱयांनी न्यायालयाची प्रतिष्ठा राखायला हवी. असे कोणते कृत्य करू नये ज्याने न्यायपालिकेच्या प्रतिमेवर परिणाम होईल, असे उच्च न्यायालयाने न्यायाधीशांना बजावले आहे. एका मद्यपी कनिष्ठ नगर दिवाणी न्यायाधीशाला कामावरून काढण्याच्या आदेशावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले.

अनिरुद्ध पाठक असे या कनिष्ठ नगर दिवाणी न्यायाधीशाचे नाव आहे. अशोभनीय वर्तनाचा ठपका पाठक यांच्यावर होता. यासह अन्य आरोप पाठक यांच्यावर ठेवण्यात आले होते. नंदुबार प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी तसा अहवाल दिला होता. त्याची गंभीर दखल घेत विधी व न्याय विभागाने त्यांना कामावरून काढण्याचे आदेश जारी केले. त्याविरोधात पाठक यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्या. अतुल चांदुरकर व न्या. जितेंद्र जेन यांच्या खंडपीठाने पाठक यांची याचिका फेटाळून लावली. विधी व न्याय विभागाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यासारखा कोणताच मुद्दा नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले.