नगरमध्ये सव्वादोन लाखांची सुगंधी तंबाखू जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; तिघांवर गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेली सुगंधी तंबाखू विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करून 2 लाख 25 हजारांची सुगंधी तंबाखू व एक टेम्पो असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी तीनजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई वडगाव गुप्ता बाह्यवळण रस्त्यावर केली. सौरभ मुकुंद धामणगावकर (वय 30) व सलमान अहमद शेख (वय 30), झाहिद ऊर्फ जावेद खान (सर्व रा. गोविंदपुरा, नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची
नावे आहेत.

वडगाव गुप्ता ते पिंपळगाव माळवी रोड, बाह्यवळण चौकात मालवाहू टेम्पोतून दोनजण सुगंधी तंबाखू चोरून विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यांच्या सूचनेवरून पथकाने बाह्यवळण चौकात सापळा लावला. टेम्पो येताना दिसताच पथकाने तो थांबविला. टेम्पोमध्ये बसलेल्या सौरभ धामणगावकर व सलमान शेख यांच्या ताब्यातून 2 लाख 25 हजार रुपये किमतीची सुगंधी तंबाखू पांढऱया रंगाच्या 15 गोण्यांमध्ये तसेच 4 लाखांचा टेम्पो असा एकूण 6 लाख 25 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही तंबाखू झाहिद खान याच्या मालकीची असून, विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगितले. त्यानंतर तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेश मोरे, संदीप घोडके, शंकर चौधरी, राहुल सोळुंके, संदीप चव्हाण, लक्ष्मण खोकले, मच्छिंद्र बर्डे, कमलेश पाथरुट, रणजित जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.