
नगर शहरातील बोल्हेगाव फाटा येथे जून्या वादातून एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हल्लेखोरांना रोखले. त्यामुळे तरुण बचावला असून, त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतली असल्याची माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी दिली.
शाम कदम (27 वर्षे, रा. बोल्हेगाव) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी संतोष धोत्रे (रा. नागापूर चर्चजवळ, एमआयडीसी) याच्यासह एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याचे व कदम यांच्यात पूर्वीपासून वाद आहेत. त्यातूनच धोत्रे याने कदम यांच्यावर हल्ला केला. याबाबत अधिक माहिती, अशी शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कदम व धोत्रे हे दोघे समोरासमोर आले. त्यांच्यात वाद होऊन धोत्रे याने धारदार शस्त्राने कदम यांच्यावर हल्ला केला. तसेच त्याने पिस्तुलही रोखले होते. याचवेळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चाहेर हे तिथून जात होते. त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी धावत जाऊन हल्लेखोरांना रोखले. तसेच धोत्रे याला ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक चाहेर यांनी दिली.
श्याम कदम यांचे बोल्हेगाव परिसरात हॉटेल आहे. या हॉटेलवरच धोत्रे व कदम यांचे 11 नोव्हेंबर रोजी भांडण झाले होते. याबाबत शाम कदम यांचा अमोल कदम यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. या फिर्यादीवरून संतोष धोत्रे याच्यासह पाच जणांविरोात भादवि कलम 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून धोत्रे हा फरार होता. आज दुपारच्या सुमाराला बोलेगाव परिसरामध्ये ही घटना घडली. या घटनेमुळे शहरांमध्ये एकच उडाली आहे. विशेष म्हणजे आलेल्या चार ते पाच जणांपैकी एकाने गावठी कट्टा काढून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोळी पूर्णपणे बाहेर आली नाही व ती पिस्तुलात अडकली. पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. मागील वादाचे कारण असल्यामुळे यामध्ये अन्य कोणाकोणाचा समावेश आहे याचाही पोलीस शोध घेत आहेत. या घटनेमध्ये श्याम कदम हा जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी शस्त्रासह दोन जणांना ताब्यात घेतलं असून रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.




























































