
बीसीसीआयने मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांचा कार्यकाळ आणखी एका वर्षासाठी वाढवला असून, आता ते 2027 मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत या पदावर कायम राहणार आहेत. त्यामुळे आगामी विश्वचषकासाठी ‘टीम इंडिया’ची मोर्चेबांधणी करण्याची जबाबदारीही त्यांच्याच खांद्यावर राहणार आहे.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, आगरकर यांचा कार्यकाळ केवळ वाढवलेला नसून, त्यांच्या कामगिरीच्या आधारे नव्याने नूतनीकरण करण्यात आला आहे. नियमांनुसार कोणताही निवडकर्ता जास्तीत जास्त चार वर्षे या पदावर राहू शकतो. बीसीसीआयने 2023 मध्ये आगरकर यांची दोन वर्षांसाठी मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती केली होती. 2025 मध्ये त्यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती. आता 2027 पर्यंत कार्यकाळ वाढल्याने ते सलग चार वर्षे या पदावर राहतील.
आगरकरांच्या काळात तीन आयसीसी किताब
अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली निवडलेल्या हिंदुस्थानी संघाने ऑक्टोबर 2023 ते मार्च 2026 या कालावधीत चार आयसीसी स्पर्धांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यापैकी हिंदुस्थानी संघाने तीन जेतेपदे पटकावली. यात 2024 आणि 2026 चे टी-20 विश्वचषक तसेच 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी यांचा समावेश आहे. याशिवाय 2023 च्या वनडे विश्वचषकात हिंदुस्थानी संघ उपविजेता ठरला होता.

























































