
>> अरुणा सरनाईक
उन्हाच्या तलखीनं शिणलेली शरीरं आणि मनं निवांत गारवा शोधत असताना श्रावणाच्या ओलाव्याने संपूर्ण सृष्टीतच एक श्रान्त भाव असतो. शहरात, जंगलात, रानांमध्ये, पर्वतावर, उघडय़ा माळरानावर, श्रावण एकाच हिरवळीच्या भावनेनं बरसत असतो. पडणाऱया प्रत्येक थेंबातून पुनश्च जीवन निर्माण करण्याची अमर्याद क्षमता श्रावणात आहे.
‘स बिलोरी आईना, सृष्टीचा पाचवा महिना’ अशी कविवर्य बा. भ. बोरकरांची नितांत सुंदर कविता आहे. श्रावणाची सुरुवात आणि बा.भ.च्या ओळी नित्य आठवतात. दरवर्षी त्यातला गोडवा नव्यानं अनुभवाला येतो. निसर्ग असाच आहे नित्य नूतन. त्याला जुनेपणा स्पर्शत नाही. मग प्रश्न पडतो, निसर्गनिर्मित मानव का जुना होतो? नव्याच्या हव्यासापाठी किती आपण वेडे होतो. जे निसर्गनियमानुसार संपणार त्याला धरून ठेवण्याचा वृथा प्रयत्न करतो. एक सुंदर विचार करायला लावणारी कथा!
पाचव्या महिन्यातील नवनवतीची, धरेची गर्भछाया हिरव्या रंगानं जशी फुलून येते त्याचं सुंदर वर्णन बा.भ. बोरकरांनी केलेलं आहे. पुढे वाढत जाणाऱया सुखाच्या कल्पनेनं सुखावलेलं धरतीचं तृप्त रूप डोळा भरून पाहण्याचं सौख्य श्रावण देतो. त्याच्या या देण्यानं आनंदित न होणारा असा कोणीच नसावा. तप्त उन्हाच्या तलखीनं शिणलेली धरती आषाढात पावसाच्या आगमनानं सुखावते, सैलावते आणि श्रावणातल्या शीतल जलधारांनी चहु अंगानं फुलते. पानोपानी पावसाची गाणी आणि थेंब थेंबं पाऊस थांबला तरी पडणारं पाणी. वळचणीच्या आधारानं पडत राहतं. आकाशापासून ते धरतीपर्यंत आपलेपणाचा ओलावा साऱ्या श्रावणात झिरपत राहतो.
कविजनांचा, प्रेमीजनांचा तो प्राणसखा आहे. बळीराजाचा तो जीवनसखा आहे. एकूण काय तो सर्वांचा आवडता. देवाधिदेव महादेवाला तो अधिकच प्रिय आहे. त्यामुळे श्रावणातल्या सोमवारी प्रत्येक शिव मंदिरात अफाट गर्दी झालेली दिसते. आजची तरुण पिढी सश्रद्ध राहिली नाही असं म्हटलं जातं. पण श्रावणातल्या सोमवारी प्रत्येक शिवमंदिरापुढे होणाऱया गर्दीत तरुणाईची संख्याही अधिक असल्याचं दिसतं.
उन्हाच्या तलखीनं शिणलेली शरीरं आणि मनं निवांत गारवा शोधत असताना श्रावणाच्या ओलाव्यानं संपूर्ण सृष्टीतच एक श्रान्त भाव असतो. शहरात, जंगलात, रानांमध्ये, पर्वतावर, उघडय़ा माळरानावर, श्रावण एकाच हिरवळीच्या भावनेनं बरसत असतो. पडणाऱया प्रत्येक थेबांतून पुनश्च जीवन निर्माण करण्याची अमर्याद क्षमता श्रावणात आहे. उघडय़ाबोडक्या पर्वतावरदेखील नकळत हिरवळ उगवून जाते. रुक्ष माणसालासुद्धा एखाद्या मायेचा स्पर्श लाभला तर आतला खडकाळपणा कोमल होऊन जातो.
नाना रंगाची हिरवी छाप असलेली वनश्री मनाला मोहून टाकते. विविध हिरव्या, पोपटी छटा, प्रौढ हिरव्या छटा. हिरवेपणाचं किती म्हणून कौतुक सांगायचं! कोवळ्या वयापासून ते परिपक्व वयापर्यंत हिरव्या रंगाचा रंगोत्सव या दिवसात बघायला मिळतो. नकळत काही ओळी आठवून जातात.
आला श्रावण-श्रावण घेऊनी पावसाच्या सरी, गाभुळलेली धरित्री शालू नेसली गर्भरेशमी काचेच्या खिडक्यांच्या तावदानांवर बाहेरील पावसाचे टप्पोरे थेंब थांबलेले असतात. हळुहळु ते ओघळत जातात. खिडकीच्या तळाशी एक छोटासा थेंबांचा समुद्र तयार होतो.
श्रावणामध्ये काय नाही? साऱया सृष्टीला मुग्ध सौंदर्य देण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. त्याची ही नानाविध रूपं साकारावी अशी वाटली नाहीत असा कलाकारच नाही. अगदी कवीपासून चित्रकारापर्यंत आणि एखाद्या लेखकापासून चित्रपट दिग्दर्शकापर्यंत अनेकांनी श्रावणाची नानाविध रूपं रेखाटली आहे. श्रावणाचं आगमन झालं की प्रेमीजनांच्या मनात एक वेगळंच काहूर निर्माण होतं. त्यांची ही अवस्था अनेक चित्रपटांमधून पडद्यावर व्यक्त झाली आहे. त्यामुळेच श्रावणाच्या आगमनाबरोबर अनेक गाणीही ओठांवर उमटू लागतात. अगदी ‘सावन का महिना, पवन करे सोर’पासून ‘श्रावणात घननिळा बरसला’पर्यंत. लताच्या कोकीळकंठाने या गाण्यांना सजवलं आहे, तेवढंच श्रावणाच्या चित्रणाने त्यांना जिवंत केलं आहे.
सोसलेले उन्हाळे, तडाखे, सारं काही वाहून मनाला स्वच्छ करणारा असाही एक दृष्टिकोन श्रावणाविषयी ठेवता येतो. कारण अपार उन्हाचा निचरा करून शांतवण्याचं सामर्थ्य श्रावणाच्या ओल्या स्वभावात आहे. तसेच ताणरहित मनाची अवस्था दूर करण्याचं सामर्थ्यदेखील श्रावणात आहे. मनाच्या शांतीसाठी महादेवासारखे दुसरे दैवत नाही. हलाहलासारखे विष पचविणाऱया महादेवाचा लाडका प्रिय श्रावण तुम्हा आम्हाला सुखकारक होतो.




























































