मुद्रा – सियाचीनच्या रणभूमीवर इतिहास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> पराग पोतदार

भारतीय लष्कराच्या इतिहासात अभिमानास्पद नवा अध्याय लिहिला गेला आहे. कॅप्टन शिवा चौहान या जगातील सर्वात उंच युद्धभूमी मानल्या जाणाऱया सियाचीन ग्लेशिअरवरील कुमार पोस्टवर प्रत्यक्ष ऑपरेशनल तैनात होणाऱया पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. समुद्रसपाटीपासून सुमारे 15,632 फूट उंचीवर असलेल्या या अत्यंत दुर्गम आणि प्रतिकूल ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राजस्थानातील उदयपूर येथील रहिवासी असलेल्या शिवा चौहान यांनी शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ‘टेक्नो एनजेआर इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’मधून सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी प्राप्त केली. लहानपणापासूनच भारतीय सशस्त्र दलात सेवा करण्याचे स्वप्न त्यांनी जपले आणि त्यासाठी प्रयत्न केले. सियाचीनमध्ये नियुक्तीपूर्वी त्यांना सियाचीन बॅटल स्कूलमध्ये अत्यंत कठीण प्रशिक्षण देण्यात आले. सहनशक्तीची कसोटी, बर्फाच्या भिंतींवर चढाई, हिमस्खलनातून बचाव, तसेच प्रतिकूल हवामानातील संरक्षणात्मक तंत्र अशी अनेक आव्हानात्मक प्रशिक्षणे त्यांनी यशस्वीपणे पार पाडली.

भारतीय लष्कराच्या कॉर्प्स ऑफ इंजिनीअर्समधील अधिकारी म्हणून कॅप्टन चौहान यांच्या नेतृत्वाखालील सेपर्सची टीम सियाचीन परिसरात विविध लढाऊ अभियांत्रिकी आणि सामरिक जबाबदाऱया पार पाडणार आहे. जुलै 2022 मध्ये कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित सियाचीन युद्ध स्मारक ते कारगिल युद्ध स्मारक या ‘सुरा सोई’ सायकल मोहिमेचे त्यांनी यशस्वी नेतृत्व केले होते. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळेच सियाचीन बॅटल स्कूलमध्ये विशेष प्रशिक्षणासाठी त्यांची निवड करण्यात आली. भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमध्ये प्रशिक्षणादरम्यान शिवा चौहान यांनी असामान्य जिद्द आणि नेतृत्वगुण दाखवले. त्यानंतर मे 2021 मध्ये त्यांची अभियंता रेजिमेंटमध्ये नियुक्ती करण्यात आली.

कॅप्टन शिवा चौहान यांच्या या ऐतिहासिक नियुक्तीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केले. “कॅप्टन शिवा चौहान यांची ही कामगिरी भारताच्या महिला शक्तीचे प्रतीक असून प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे,” असे ते म्हणाले. कॅप्टन शिवा चौहान यांची सियाचीनवरील नियुक्ती ही केवळ वैयक्तिक यशाची कहाणी नसून भारतीय लष्करातील महिलांच्या वाढत्या सहभागाची आणि त्यांच्या कर्तृत्वाची प्रेरणादायी नोंद ठरली आहे.