पुस्तकाच्या पलीकडे…फिनलँडची प्री-स्कूल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. अनिल कुलकर्णी

अगदीच लहान मुलांना पुस्तकांच्या पलीकडचं जग प्रत्यक्ष दाखवायला हवं. पुस्तकांच्या पानांपेक्षा झाडावरच्या पानांचे निरीक्षण, फुलांचे निरीक्षण, फुलांचा सुगंध यांच्या जाणिवेत त्यांना रमू द्या. भवताल ओळखीचं झालं की, शिकणं सुलभ होतं. पुस्तकांतल्या रूक्ष शब्दांचा अर्थ निसर्गात शोधता यायला हवा.

अशाच प्रकारे फिनलॅंडमध्येही पूर्वप्राथमिक शिक्षणाचा विचार करताना पुस्तकांच्या पलीकडे जे आहे, त्याचा परिचय अधिक करून दिला जातो. फिनलॅंडमध्ये प्री स्कूलच्या रचनेचा मूळ उद्देशच विद्यार्थ्यांना शाळेसाठी तयार करणे हा असतो. शाळेत जाण्याआधी मुलं शाळेत आवश्यक काwशल्याने युक्त असावीत, असं अपेक्षित असल्यामुळे काही सवयी मुलांना येथे लावल्या जातात. वयाची सहा वर्षे पूर्ण झालेली मुलं इथे येतात. मुलं शाळेसाठी याच काळात तयार झाली तर नंतरची प्रक्रिया सोपी जाते. इथे कोणत्याही प्रकारचं पुस्तकी शिक्षण न देता खेळांमधून त्यांना सामान्य ज्ञान दिलं जातं. कारण या वयात मेंदूचा सर्वार्थाने विकास होत असतो.

वर्गामध्ये गटात काम करता येणं ही मुलांसाठी महत्त्वाची गोष्ट असते. मुलांनाही सवय लागावी म्हणून या एक वर्षाच्या काळात त्यांना गटात काम करण्यास सांगितले जाते आणि आवश्यक त्या ठिकाणी मदत केली जाते. मुलांना वाचता यावं आणि लिहिण्यासाठी त्यांना उत्सुकता निर्माण व्हावी या गोष्टीवर येथे काम केलं जातं.

शाळेमध्ये व्यवस्थित वागता यावे यासाठी स्वतःची कामं स्वतः करणं, गटात चांगल्या प्रकारे काम करता येणं यासाठी मुलांना तयार केलं जातं.

बालकाचा विकास हा शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि भाषिक अशा विविध टप्प्यांवर होताना दिसून येतो. येथील शाळेच्या शिक्षिका जिम हॉलमध्ये शारीरिक शिक्षणाचे धडे देत असताना विविध आकारांच्या चकत्यावर जसे की, त्रिकोण, गोल, चौकोनामध्ये विद्यार्थ्यांना उभे करतात. त्यातून बालकांना विविध गणितीय आकाराची ओळख होते. त्याचप्रमाणे खेळातून शिक्षण या संकल्पनेद्वारे विविध रंग व त्यांचे ज्ञान हे विद्यार्थ्यांना होताना दिसते. स्वतःच्या नावाचे आद्याक्षर जिथे असेल तिथे उभे राहून पाय ठेवायचा, नातेवाईकांची, मित्रमैत्रिणींची नावे कुठल्या आद्याक्षरापासून सुरू होतात याची माहिती विद्यार्थ्यांना होते. त्यामुळे भाषेचा अभ्यासही होतो.

इथे पाठय़क्रमापेक्षा अभ्यासक्रमाला जास्त महत्त्व दिलं जातं. भाषिक विकास पर्यावरण, निरीक्षण, माझा समाज, कुटुंब, माझी शाळा आणि मी तसेच शारीरिक क्षमतांचा विकास आणि अभिव्यक्ती विकास अशा बाबींचा विचार येथे केला जातो. मुलांना कोरे कागद आणि खडू इत्यादी रंग साहित्य देऊन कोणतेही चित्र काढायला, रेघोटय़ा मारायला सांगितले जाते. मुलं मनसोक्त त्याचा आनंद घेतात. रेषेला वळणच हवं, रंग चित्राच्या बाहेर जाऊ नये इत्यादी बंधनं त्याला या वेळी घातली जात नाहीत. चित्रकलेची आवड निर्माण होणं, स्वतः काहीतरी केल्याचा आनंद मुलांना मिळणं हा त्यामागचा हेतू असतो.

गेली सलग पाच वर्षे फिनलॅंड हा देश आनंदी देश व सर्वोत्तम शिक्षण पद्धती असलेला देश म्हणून ओळखला जातो. येथील शिक्षण व्यवस्थेचा अभ्यास करून या देशाने शिक्षण पद्धतीत नक्की कोणते बदल केले, ज्यामुळे ही पद्धत इतकी यशस्वी झाली याबद्दलचा अभ्यास हेरंब कुलकर्णी व शिरीन कुलकर्णी यांनी करून अशा प्रकारच्या सकारात्मक गोष्टींचा अंतर्भाव हिंदुस्थानातील शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर सीसीई (centre for creative education) अंतर्गत हिंदुस्थानातल्या त्यांच्या शाळेत त्यांनी उपक्रमांची सुरुवात केली आहे.
एखादी यशोगाथा जेव्हा सार्वत्रिक होते, तेव्हाच विकास होतो.

[email protected]