
>> प्रा. केशव आचार्य
‘26/11’ मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला एक दशक पूर्ण झाले. या हल्ल्यात तुकाराम ओंबळे यांच्या बलिदानामुळे फक्त अजमल कसाब हा एकमेव हल्लेखोर जिवंत सापडला. यामुळे कट पकिस्तानच्या मदतीने लश्कर-ए-तोयबाने रचला होता हे सिद्ध झाले. हा हल्ला अत्यंत सुनियोजित आणि काळजीपूर्वक आखलेला एक कट होता.
या हल्ल्यात स्थानिक मदतनीसांचा सहभाग नव्हता, असे तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम म्हणाले होते आणि त्यामुळे स्थानिक मदतनीसांना शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला नाही. परंतु स्थानिक मदतनीसांच्या सहभागाशिवाय इतका योजनाबद्ध हल्ला शक्य नाही. चिदंबरम यांच्या सूचनेपूर्वी मुंबई पोलिसांनी स्थानिक मदतनीसांची बरीच माहिती शोधून काढली होती असे सांगितले जाते. फहीम अन्सारी आणि सबाहुद्दीन अहमद शब्बीर या दोघांनी पुरवलेल्या नकाशांमुळेच दहशतवाद्यांना हव्या असलेल्या ठिकाणांवर अचूक हल्ले करणे सोपे गेले असेही प्रसिद्ध झाले आहे. या दोघांनी ताजमहाल हॉटेल, ट्रायड्रेंट हॉटेल इत्यादी 12 महत्त्वाच्या ठिकाणी टेहळणी केली होती. उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी फहीम अन्सारीला पकडल्यानंतर एटीएसच्या ताब्यात दिले. तो मोतीलाल नगर, गोरेगाव, मुंबई येथे रहात असे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर भयंकर मोठा हल्ला करण्याची लश्कर-ए-तोयबाची तयारी चालू आहे असे अन्सारीने सांगितले. तो पाकिस्तानमधील मुझफराबाद येथील प्रशिक्षण केंद्रात सहा महिने होता. फहिम अन्सारी आणि सबाहुद्दीन सिद्दिकी शेख या दोघांना पोलिसांनी पकडलेही, परंतु पुरेशा पुराव्याअभावी न्यायालयाने त्यांना सोडून दिले. याबाबत प्रश्न असा निर्माण होतो की, पुरेसा पुरावा पोलिसांनी का मिळवला नाही? अथवा तो न्यायालयापुढे नीट का सादर केला नाही? स्थानिक मदतनीसांच्या सहभागाशिवय इतका योजनाबद्ध हल्ला शक्य नाही, असे अनेक पोलीस अधिकारी म्हणतात.
याबाबत पुढील काही घटनांचा विचार व्हावाः
- नरीमन हाऊस येथे एकूण सहा संशयित प्रत्यक्षदर्शींना दिसले. त्यापैकी दोन जणांना एनएसजी कमांडोंनी कंठस्नान घातले. उरलेले चारजण कुठे गेले? ताज, ओबेरॉय व छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील सीसीटीव्ही कॅमेर्याचे फुटेज प्रसारमाध्यमांना पोलिसांनी दाखवले, परंतु नरीमन हाऊस येथील दाखविले नाही.
- मुंबईवरील हल्ल्यात किमान दोन डझन अतिरेक्यांचा सहभाग होता असा गौप्यस्फोट ‘आयबी; या देशाच्या प्रमुख गुप्तचर संघटनेच्या एका वरिष्ठ अधिकार्याने केला आहे. आयबीच्या मते ताज, ओबेरॉय, नरीमन हाऊस येथे घमासान चालू असताना 14 अतिरेकी तेथून निसटले असावेत.
- या हल्ल्याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे अशी मागणी लोकसभेतील त्यावेळचे विरोधी पक्षनेते लालकृष्ण आडवाणी यांनी केली होती. यावेळी त्यांनी अमेरिकेतील ‘9/11’ दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेत अशी चौकशी झाली होती याची आठवण करून दिली. सीआरपीएफ कँपवर दहशतवादी हल्ला करणार्या फहिम अन्सारीच्या कबुलीजबाबकडेही आडवाणी यांनी खासदारांचे लक्ष वेधले, परंतु या अन्सारीलाही मोकळे सोडण्यात आले.
अमेरिकेतील ‘11/9’च्या हल्ल्यानंतर आणि लंडनमधील ‘7/7’च्या हल्ल्यानंतर तेथील चौकशी समित्यांनी शेकडो पानांचे अहवाल लिहिले आणि ते सरकारला आणि तेथील जनतेलाही सादर केले. आपल्या सरकारने राम प्रधान समितीवर अनेक बंधने टाकून मर्यादित स्वरूपात अहवाल तयार करायला लावले. राम प्रधान समितीने 64 पानांचा अहवाल तयार केला. सरकारने त्यावरही उचित कारवाई केली नाही.
अमेरिका आणि अन्य परदेशी लोक दहशतवादाबाबत जेवढे जागरूक आहेत तेवढे हिंदुस्थानी लोक नाहीत, अशी खंत ऑड्रिअन लेव्ही आणि कॅथी स्कॉट-क्लार्क या ब्रिटिश पत्रकारांनी ‘रेडिफ’ या संस्थेला मुलाखत देताना व्यक्त केली. या द्वयीने खूप संशोधन करून “The Siege: The Attack on the Taj” नावाचे पुस्तक 2013 मध्ये लिहिले आणि ते पेंग्विन प्रकाशन संस्थेने प्रसिद्ध केले आहे. ‘26/11’ मुंबई हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी काही महिन्यांपूर्वी मान्य करून सर्वत्र मोठीच खळबळ उडवून दिली. त्यानुसार पाकिस्तानमध्ये दहशतवादविरोधी न्यायालयात ‘26/11’ हल्ल्याबाबत खटला पुन्हा सुरू झाला आहे. मुंबईवरील हा हल्ला हे हिंदुस्थानविरुद्ध एक प्रकारचे युद्धच होते. मुंबईकरांनी त्याबाबत उदासीन राहणे योग्य नाही.































































