स्त्रीशक्तीचे नृत्यस्वरूप!

2594

नृत्य हा स्मितालयाचा आत्मा आहे. ज्येष्ठ ओडिसी नृत्यगुरू झेलम परांजपे यांच्या स्मितालयातर्फे महिलादिनानिमित्त ‘सर्वंनृत्यमयम्’ हा विशेष कार्यक्रम येत्या रविवारी सादर होणार आहे.

‘स्मितालय’… सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ ओडिसी नृत्यांगना झेलम परांजपे यांची नृत्यशाळा… या नृत्यशाळेला नुकतीच 30 वर्ष पूर्ण झाली. या संस्थेतर्फे महिला दिनानिमित्त ‘सर्वंनृत्यमयम्’ हा स्त्रीयांच्या कलागुणांना प्राध्यान्य देणारा आणि त्यांनी सादर केलेला अनोखा कार्यक्रम 10 मार्च रोजी सकाळी 10 वाजता रवींद्र नाट्यमंदिरात विनामूल्य साजरा होणार आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील आणि झेलम परांजपे या बालपणीच्या मैत्रिणी… राष्ट्रसेवा दल कलापथकात दोघीही एकत्र होत्या. त्यामुळे स्मिता पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘स्मितालया’ची स्थापना झाली. संस्थेत 1995पासून आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. त्या काळात फक्त सामाजिक आणि राजकीय कार्यकर्तेच महिला दिन साजरा करायचे. तेव्हा कलेच्या दृष्टिकोनातूनही व्हायला हवा या विचारातून स्मितालयातर्फे दरवर्षी महिला दिन साजरा केला जातो. वय वर्षे 10 ते 65 वर्षांच्या एकूण 47 स्त्री कलाकार यामध्ये आपली कला सादर करणार आहेत, अशी माहिती ज्येष्ठ ओडिसी नृत्यांगना झेलम परांजपे देतात.

‘जनी म्हणे’…

मिनी थिएटरमध्ये 2.30 ते 3.30 जनाबाईंच्या अभंगांवर ‘जनी म्हणे’ हा अभंगांचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात जनाबाईंच्या पाच अभंगांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये जनी लहान असते तेव्हा, विठू तिच्या केसांना तेल लावतो, थोडी मोठी झाल्यावर विठू सखा म्हणून तिला कामात मदत करतो. त्यानंतर विठूला प्रेयसी म्हणून भेटायला जाते, विठूला सगळ्या जगाचा तारणहार मानते अशा वेगवेगळ्या प्रसंगांतील अभंगाच्या छटा… या कार्यक्रमात प्रेक्षकांना पाहायला, ऐकायला मिळतील.

वैशिष्टय़पूर्ण स्वरूप

कोणत्याही प्रकारचं संगीत, कोणताही विषय किंवा कोणत्याही शब्दांच्या आधारावर स्मितालय नृत्याच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचावं या उद्देशाने या सर्वच कार्यक्रमांचं सादरीकरण होणार आहे. यामध्ये गणित आणि नृत्य यावर आधारित ‘लीलावती नृत्य’, नर्मदा नदीची गोष्ट यामध्ये नर्मदा, आदिवासी आणि त्याचं धरणाविरुद्धचा लढा, बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांवर आधारित ‘बहिणाई’ या कार्यक्रमाचा संपादित अंश, निसर्ग आणि पाणी यांचं संवर्धन कसं करायचं याची ओळख करून देणारा ‘जलश्री’ हा कार्यक्रम, शेतातल्या प्राण्यांपासून जंगलातल्या प्राण्यांपर्यंत नृत्यदृष्यांवर आधारित इंग्रजी गाणी असलेला ‘फार्म टू जंगल’, बॉलीवूडमधील काही गाण्यांना  ‘ओडिसी’ पद्धतीची झलक अशा अनोख्या आणि वैशिष्टय़पूर्ण, भरगच्च कार्यक्रमांचा आनंद यावेळी प्रेक्षकांना विनामूल्य घेता येईल.

नृत्यातूनही अनेक विषयांची निर्मिती

वेगवेगळे विषय नृत्याच्या माध्यमातून कसे रंगवण्यात आले आहेत. बऱ्याचदा सिनेमा, नाटक यांतून वेगवेगळे विषय बघण्याची, ऐकण्याची सवय रसिक प्रेक्षकांना असतेच, मात्र  नृत्यातूनही अनेक विषयांची निर्मिती होऊ शकते. ते नृत्याद्वारे कसे मांडले जाऊ शकतात, हे याद्वारे रसिकांना नक्कीच पाहायला मिळेल. हिंदी, मराठी, इंग्रजी आणि संस्कृत अशा चारही भाषांत हा कार्यक्रम होईल. म्हणून प्रेक्षकांनी या दृष्यात्मक कार्यक्रमाला यावे, असे आवाहन झेलम परांजपे प्रेक्षकांना करतात.

कथ्थकालय

कथ्थक नृत्यांगना रंजना फडके यांच्या ‘कथ्थकालय’ या संस्थेतील कलाकारांनी सादर केलेला कथ्थक नृत्याचा कार्यक्रम सकाळी 10 वाजता रसिकांना पाहता येईल.

आपली प्रतिक्रिया द्या